Pune Crime Court News | पुणे महापालिका भरती घोटाळा; राजेंद्र बबनराव खेडेकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
पुणे: Pune Crime Court News | पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी राजेंद्र खेडेकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला.
आरोपांचे स्वरूप आणि गांभीर्य, आरोपीचा प्राथमिक सहभाग, तपासाची सद्यस्थिती, प्रकरणाची व्याप्ती तसेच आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता लक्षात घेता अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. शर्मा आणि एस. आर. पवार यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे आदेश दिले.
या प्रकरणात जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबनराव खेडेकर Rajendra Babanrao Khedekar याच्याविरोधात भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तक्रारींनुसार, हा कथित भरती गैरव्यवहार मार्च २०२२ पासून सुरू होता. बेरोजगारांना पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेतल्याचा आरोप आहे.
महापालिकेचे कथित बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तीपत्रे तयार करण्यात आल्याचे तक्रारींमध्ये नमूद आहे.
उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, सेवापुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्या देण्यात आल्याचा आरोप आहे. उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी त्यांच्या बँक खात्यांत पगार जमा झाल्याचे दाखवण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
सरकारी पक्षाने असा युक्तिवाद केला की, कथितरीत्या धनादेश, ऑनलाइन व्यवहार आणि रोख स्वरूपात पैसे स्वीकारण्यात आले. बनावट लेटरहेड आणि शिक्के कोठून तयार करण्यात आले तसेच या प्रकरणामागे मोठे संघटित रॅकेट आहे का, याचा तपास करणे आवश्यक आहे.
सरकारी वकील चंद्रकिरण साळवी आणि वामन कोळी यांनी आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
