Pune Crime News | पुणे : भोंदूबाबाचा अघोरी सल्ला अन् अंधश्रद्धेच्या नावाखाली विवाहितेला पतीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करण्यास भाग पाडलं;  कोल्हापुरच्या गडहिंग्लजमध्ये राहणाऱ्या पतीसह 5 जणांवर गुन्हा, नांदेड सिटीमधील दोघांचा आरोपींमध्ये समावेश

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  अंधश्रद्धेच्या नावाखाली 29 वर्षीय विवाहित महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून पतीने अंगारा मिसळलेले पाणी पिण्यास भाग पाडल्याचा तसेच खासगी अवयवाशी (प्रायव्हेट पार्ट) संबंधित पूजा करण्याची  जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

याप्रकरणी संबंधित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तिच्या पतीसह (मु.पो.सरोळी, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापुर) सासरच्या एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघेजण हे पुण्यातील नांदेड सिटीमध्ये रहावयास आहेत. तक्रारीनुसार हा प्रकार 11 मे ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत घडला.

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पती तिला एका भोंदूबाबाकडे घेऊन गेला होता. पतीचा कथित मंगळदोष दूर करण्यासाठी काही विधी करण्याचा सल्ला त्या व्यक्तीने दिल्याचा आरोप आहे.

या सल्ल्यानुसार महिलेला अंगारा पाण्यात टाकून ते पिण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर हळदी-कुंकू लावून पतीच्या खासगी अवयवाशी संबंधित पूजा करण्यासही तिला जबरदस्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.

हा विधी झाल्यानंतर पतीचा मंगळदोष दूर झाल्याची समजूत कुटुंबीयांनी करून घेतली. मात्र, त्यानंतर पतीने महिलेला पुन्हा सासरी नांदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकाराला विरोध केल्यानंतर महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचेही तिने म्हटले आहे.

तसेच, आपल्या कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून केवळ पतीचा कथित मंगळदोष दूर करण्यासाठीच विवाह करण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

महिलेच्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलीस तपासात  आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.

You may have missed