Pune Crime News | हज, उमराह यात्रा स्वस्तात करुन देण्याच्या नावाखाली 80 भाविकांची कोट्यावधींची फसवणुक; अल खलीफा टुर्स ट्रॅव्हल्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | हज, उमराह, जियारज यात्रा स्वस्तात करुन देण्याच्या नावाखाली ८० ते ९० भाविकांकडून पैसे घेऊन त्यांना यात्रेबाबतची कोणतीही माहिती न देता कोट्यावधीची फसवणूक करुन संचालक फरार झाल्याचे समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी अल खलीफा टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Al Khalifa Tours and Travels)
अमीर सरदार शेख Ameer Sardar Shaikh (वय ३८), मिस्बा अमीर शेख Misba Ameer Shaikh (वय ३५, दोघे रा. भवानी पेठ), साबीर रियाज शेख Sabir Riaz Shaikh (वय ३८, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या अल खलीफा टुर्स अॅड ट्रॅव्हल्सच्या संचालकांची नावे आहेत. याबाबत शेहजाद मोहम्मद इस्लाम शेख (वय ३४, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कौसरबाग येथील अल खलीफा टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात १९ मार्च ते १५ मे २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेहजाद शेख यांना कुटुंबासह हज यात्रा करायची होती. मार्च २०२६ मध्ये त्यांची अल खलिफा टुर्स अँड ट्रव्हल्सचे पार्टनर साबीर शेख यांच्याशी भेट झाली. त्यांनी अमीर शेख, मिस्बा शेख यांची ओळख करुन दिली. साबीर शेख हे मॅनेजिंग डायरेक्टर असल्याचे भासवणारी कागदपत्रे व जाहिराती दाखविल्या. हज आणि उमराह यात्रा स्वस्त दरात आयोजित करुन देण्याचे वचन दिले. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी कुटुंबातील ४ जणांसाठी हजचे बुकिंग केले. हा व्यवहार २२ लाख रुपयांमध्ये ठरला. त्यांनी वेळोवेळी २१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर १५ मे रोजी सोशल मीडियावरुन त्यांना समजले की, अल खलिफा टुर्स अँड ट्रव्हल्स संस्थेचे मालक, चालक व संबंधित यांनी उमरा, हज, जियारत यात्रांच्या नावाखाली अनेक लोकांकडून करोडो रुपये गोळा करुन फसवणूक करुन ते पळून गेले आहे. ते कौसरबाग येथील कार्यालयात गेले, तेव्हा तेथे ७० ते ८० लोक उपस्थित होते. त्या सर्वांची फसवणूक झाली होती. अल खलिफा टुर्स अँड ट्रव्हल्सचे संचालक यांचे फोन बंद लागत होते.
संचालकांकडे हज व उमराहचे कोणतेही अधिकृत लायसन्स नसतानाही त्यांनी त्यांच्या लेटरहेड तसेच पावत्यांवर हज अँड उमराह मिनिस्टरी, असे खोटे नमूद केल्याचे दिसून आले. फसवणूक झालेल्या सर्वांनी अॅड. तोसिफ शेख यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांची भेट घेतली. त्यानंतर सोमवारी रात्री कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.
