Pune Crime News | 15 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने उद्योजक अशोक जैन यांनी जीवन संपवलं; डेक्कन पोलिसांनी चौघा जणांवर केला गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | व्यवसायात १५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने उद्योजक अशोक जैन यांनी विषारी औषध पिऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नथुसिंह राजपुरोहित, सतीश राजपुरोहित, भगवान राजपुरोहित आणि प्रल्हाद चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अशोक मिलापचंद जैन (वय ६१, रा. सॅलीसबरी पार्क) असे विषारी औषध पिऊन जीवन संपविलेल्या उद्योजकाचे नाव आहे. त्याचे पुत्र मोहित अशोक जैन (वय ३२, रा. मिनाक्षी सोसायटी, सॅलीबरी पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार डेक्कन जिमखान्यावरील आपटे रोडवरील हॉटेल कोरेनेट येथे १० मे रोजी दुपारी पावणे चार ते चार वाजेच्या दरम्यान घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे बांधकाम व्यवसायिक असून कोंढव्यात त्यांचा एक प्रकल्प सुरु होता. प्रचित हाईट या प्रकल्पामध्ये आरोपींनी त्यांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी हॉटेल कोरेनेट येथील रुममध्ये विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविले होते. जैन यांचा फोन बंद असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता ते घरातून दुचाकीवर बाहेर पडले होते. पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत आपटे रोडवर आले. तेव्हा हॉटेल कोरेनेटमधील त्यांची रुम आतून बंद असल्याचे लक्षात आले. रुम उघडली तेव्हा आतमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले होते. १५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानेच त्यांनी जीवन संपविल्याचे मोहित जैन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.

You may have missed