Pune Crime News | प्रियकराने ब्लेडने गळा चिरलेल्या तरुणीची 10 दिवस मृत्युशी झुंज ठरली अपयशी; चंदननगर पोलिसांनी प्रियकराला हिंगोलीहून केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | प्रेमप्रकरणात लग्नास नकार दिल्याने प्रियकराने ब्लेडने गळा चिरुन जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीने १० दिवस मृत्युशी झुंज दिली. परंतु, तिची ही झुंज अपयशी ठरुन शुक्रवारी हिचे उपचारादरम्यान निधन झाले.

उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, रा.चंदनगर, मुळ. उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ भगतसिंग जसवंतसिंग दोहरे (वय २५) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. उजालादेवी हिचा प्रियकर दिलीप राठोड (वय २२, रा. हिंगोली) याला चंदननगर पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरातून अटक केली आहे. ही घटना चंदननगर येथील पठारे वस्तीमध्ये बुधवारी २९ एप्रिल रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास घडली होती.

आरोपी दिलीप राठोड आणि उजालादेवी हे दोघे विमाननगर येथील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. तेथे दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. मॉलमधील काम दिलीप याने सोडले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात वाद होते. त्याच कारणातून बुधवारी रात्री दिलीप हा तरुणी राहत असलेल्या पठारेवस्ती येथे आला. तेव्हा ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ आणि भावाची बायको बाहेर कामावर गेले होते.  त्याने घरात घुसून तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. तरुणीवर हल्ला केला. त्यानंतर तो पसार झाला.

तरुणीने फोन करून आपल्या भावाला ही माहिती दिली. तु लवकर घरी ये मला एका मुलाने मारले आहे. खूप लागले आहे. माझ्या गळ्यातून आवाज येत नाही. त्यानंतर तरुणीने आपल्या भावालाच व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी तरुणी भावाला रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. भावाने घराकडे धाव घेतली.  तोपर्यंत तेथील काही नागरिक आणि तरुणीचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणीला तिला कोणी मारले असे विचारले तेव्हा तिला बोलता येत नव्हते. तिने इशारा करून पेन आणि कागद मागितला. त्यावर तिने दिलीप राठोड असे लिहिले़

पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरातून दिलीप राठोड याला अटक केली. चौकशीत त्याने सांगितले की, आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते़ तिने मला लग्नास नकार दिला होता. अशातच तिचे लग्न ठरल्याचे समजले. त्या रागातून तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे दिलीप राठोड याने पोलिसांना सांगितले. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या उजालादेवी हिचा शुक्रवार पहाटे मृत्यु झाला.

You may have missed