Pune Crime News | हिंदु देवदेवतांविषयी भ्रम उत्पन्न करुन ख्रिश्चन धर्मांतरीत करण्याचा प्रयत्न करुन अंधश्रद्धा पसरविणाऱ्या ब्रिटिश नागरिक बिशपसह पवित्र नाम देवालय चर्चच्या 12 विश्वस्तांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | येशुमुळे आजार बरे होत असल्याचा, पाऊस पडत असल्याची अंधश्रद्धा पसरवुन हिंदु धर्माविषयी भ्रम निर्माण करुन ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या ब्रिटीश नागरिक बिशपसह पवित्र नाम देवालय या चर्चच्या १२ विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रिक्षाचालक अमित राजू भोसले (वय ३१, रा. रामोशी गेट, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन ब्रिटीश नागरिक बिशप पंकज जेम देवनुर Bishop Pankaj Jem Devnur (वय ५०, रा. चर्च कंपाऊंड, सिद्धनाथवाडी, ता. वाई, मुळ रा. मॅचेस्टर, ब्रिटीश युनायटेड किंगडम) तसेच चर्चचे विश्वस्त व आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवार पेठेतील पंचहौद चौक येथील पवित्र नाम देवालय येथे ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता घडला.

पवित्र नाम देवालय हे पंचहौद मिशन चर्च (चर्च ऑफ द होली नेम) नावाने ओळखले जाते. ब्रिटीश काळात १८८५ मध्ये हे चर्च बांधण्यात आले आहे. ७ ऑगस्ट १८८५ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण होऊन उद्धाटन करण्यात आले होते. चर्चच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश धर्म प्रचारक बिशप पंकज देवनुर हे ७ ऑगस्ट रोजी पुण्यात आले होते. त्यांचे वर्धापनदिनानिमित्त प्रवचन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी हिंदु संस्कृतीतील किर्तन, संत, माऊली अशा शब्दांचा वापर करुन जमलेल्या हिंदुना प्रभु येशुच्या भक्तीचा मार्ग सांगितला. हिंदुच्या मंदिर व देव देवदेवतांविषयी भ्रम उत्पन्न करुन हिंदु व इतर धर्मीयांची दिशाभुल करुन त्यांना लबाडीच्या इराद्याने धर्मांतरीत करण्याचा प्रयत्न करीत धार्मिक भावना दुखवल्या. तसेच येशुचे नाव घेऊन आजार बरे होत असल्याचा, पाऊस पडत असल्याची अंधश्रद्धा पसरवत होते. हिंदु व इतर धर्मीयांनी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित होऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारावा याच हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांनी सांगितले की, याप्रकरणी धर्मप्रचारक व १२ विश्वस्तांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

You may have missed