Pune Crime News | नृत्यांगणा निशा मुंबईकर, शुभांगी थोरात अडचणीत; दहीहंडी कार्यक्रमात विना परवाना लावणी नृत्याचा कार्यक्रम करणार्या मंडळाचे अध्यक्ष, आयोजकवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | दहीहंडी उत्सवात विनापरवाना लावणी कार्यक्रमाचे आयोजन केल्या प्रकरणी बिबवेवाडी परिसरातील एका मंडळाच्या पदाधिकार्यांसह नृत्यांगणा राधा पाटील यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना ताजी असतानाच विना परवाना लावणी कार्यक्रम करणार्या दोन मंडळांसह निशा मुंबईकर व शुभांगी थोरात तसेच सहकलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडीतील तीन हत्ती चौकात अष्टविनायक मित्र मंडळाकडून शनिवारी ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवात नृत्यांगणा निशा मुंबईकर यांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. दहीहंडी उत्सवात कार्यक्रम सादर करताना अश्लील नृत्य प्रकारांना बंदी घालण्यात आली होती. तसेच, कार्यक्रम सादर करणार्या कलाकारांनी मुंबईतील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. कार्यक्रमासाठी परवानगी मिळण्याकरिता पोलिसांकडे या पद्धतीनुसार अर्ज सादर करावा लागतो. मात्र, कार्यक्रमाचे आयोजक किंवा कार्यक्रम सादर करणार्या लावणी नृत्यांगना, तसेच मंडळांच्या पदाधिकार्यांकडून अशा प्रकारची परवानगी मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करण्यात आला नव्हता. आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष पवन सूर्यकांत डोंगरे, सागर सोनवणे, नृत्यांगणा निशा मुंबईकर, तसेच सहकलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राहुल राठोड यांनी याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक मिठारे तपास करत आहेत.
दहीहंडी उत्सवात विनापरवाना लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणी धनकवडीतील रिस्की बॉईज ग्रुपचे (शिवराज मित्र मंडळ) अध्यक्ष बंडू मडीवाल, उपाध्यक्ष मयूर भावेकर, नृत्यांगणा शुभांजली उर्फ शुभांगी थोरात यांच्यासह चार नृत्यांगणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सोपान पाटोळे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाराध्ये तपास करत आहेत.
