Pune Crime News | कर्मचार्यांना मारहाण करुन किचन, कार्यालयातील साहित्य काढून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन हर्षल बँक्वेट हॉलचे मालक शाम कासट, सिद्धार्थ कासट यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | हर्षल हॉल येथील भाड्याने दिलेले किचन, कार्यालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश करुन तेथील साहित्य बाहेर काढून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोथरुडमधील हर्षल बँक्वेट हॉलच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
शाम हरीविलास कासट Shyam Harivilas Kasat (वय ७०) आणि सिद्धार्थ शाम कासट Siddharth Shyam Kasat (वय ४२, दोघे रा. बँक्वेट हॉल, कोथरुड) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत श्रीपाद प्रकाश चव्हाण (वय ४४, रा. सरगम बिल्डिंग, नांदेड सिटी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २३ सप्टेंबर पासून ३ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीपाद चव्हाण यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. २०१९ मध्ये त्यांनी हर्षल बँक्वेट हॉल येथील इनडोअर केटरिंगसाठी ४० लाख रुपये डिपॉझिट देऊन व्यवसाय सुरु केला. त्यांनी वेळोवेळी भाडे करारनामा करण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी टाळाटाळ केली. २०२२ पासून शाम कासट यांनी १५ वर्षांचा तोंडी करारनामा करुन त्यांना दर महिन्याला भाडे पट्टा पावती देत गेले. सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांच्या व्यवसाय सुरळीत सुरु होता. त्यांच्या फर्मचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालत होता. त्यामुळे त्यांचा केटरिंग व्यवसाय बळकावण्याच्या भावनेने जागा मालकांनी त्यांच्या स्टाफला आमिष देऊन त्यांच्याकडे नोकरी करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. तो प्रयत्न फसल्यामुळे कासट यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी कोणतीही पूर्व कल्पना न देता फिर्यादी यांना केटरिंग व्यवसाय थांबण्याच्या आशयाची नोटीस दिली. त्यावर फिर्यादी यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी आक्षेप नोंदवला.
तेव्हा पासून त्यांनी फिर्यादी यांना जागेत जाण्यास मज्जाव करण्यासाठी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. किचन आणि ऑफिसचा ताबा फिर्यादीकडे असताना देखील त्यांच्या कर्मचार्यांना धमकी, शिवीगाळ करुन मारहाण करुन किचन व ऑफिसच्या चाव्या हिसकावुन घेण्याचा प्रयत्न केला. १ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाम कासट, सिद्धार्थ कासट व त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी मिळून किचनचा दरवाजा लोखंडी रॉडने तोडून त्यातील उपकरणे, भांडी, कटलरी, फर्निचर व इतर साहित्य यांची तोडफोड व नासधुस केली. सर्व सामान बाहेर काढून किचनच्या बाहेर ठेवले. हे फिर्यादी यांना समजल्यावर ते तेथे पोहचले. त्यावेळी तेथील लोक टेम्पोमध्ये साहित्य भरुन घेऊन गेले. त्यांना ऑफिसमधील ३० ते ४० हजार रुपयांची रोकड व कागदपत्रे आढळून आली नाहीत. सहायक पोलीस निरीक्षक संदिप येसणे तपास करीत आहेत.
