Pune Crime News | टेम्पो ट्रॅव्हल्सची वर्षानंतर पुन्हा मुळ मालकाला विकून पैसे घेऊन गाडी घेऊन गेला पळून, अधिकचे पैसे मागून नंबरप्लेट बदलून विक्री करण्याची दिली धमकी
पुणे : Pune Crime News | गाडी खरेदी केल्यानंतर गाडी मालकाने गाडी नावावर करुन घेण्यास सांगितले. त्यावर त्याने ती गाडी वर्षभराने मुळ मालकाला परत विक्री करुन त्यांच्याकडून रोख पैसे घेतले. गाडी परत न करता ती घेऊन निघून गेला. जादा पैसे दिले नाही तर गाडी नंबरप्लेट बदलून दुसऱ्याला विकण्याची धमकी दिली आहे.
याबाबत बापूर नथु पांगारे (वय ४५, रा. कलश बिल्डिंग, महाराणा प्रताप चौक, भारती विद्यापीठ) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षयकुमार सिद्राम कपरट्टी Akshay Kumar Siddram Kapratti (रा.बेळगांव, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची फोर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हल्स ही २० आसनी गाडी आहे. त्यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. आरोपी अक्षयकुमार याचाही ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. मार्च २०२५ मध्ये पांगारे यांनी त्यांची टेम्पो ट्रॅव्हल्स अक्षयकुमार याला साडेबारा लाख रुपयांना विकली होती. तो तिचा वापर करत होता. पांगारे यांनी त्याला गाडी स्वत:च्या नावावर करुन घेण्यास सांगत होते. परंतु, तो टाळाटाळ करत होता. सप्टेंबर २०२६ मध्ये त्याने ती गाडी विकायची आहे, असे सांगून तुम्ही गाडी परत घेता का, असे विचारले. त्यावर त्यांनी १० लाख रुपयांना घेतो, असे सांगितले. त्यांच्यात व्यवहार ठरला.
पांगारे यांनी ५० हजार रुपये ऑनलाईन पाठविले. त्याने मी व्यवहार रोखीत केला होता. मला रोख रक्कम पाहिजे असे सांगितले. त्यानुसार त्यांनी ६ ऑक्टोंबर रोजी ९ लाख ५० हजार रुपये रोख दिले. त्याने आंबेगाव डिमार्ट जवळील शेल पेट्रोल पंपासमोर गाडी पार्क केली. आज मी गाडीत झोपतो़ असे सांगितले. ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजता पांगारे हे टेम्पो ट्रॅव्हल्स पार्क केली तेथे गेले. तेव्हा गाडी तेथे नव्हती. अक्षयकुमार कपरट्टी याला फोन करुन विचारल्यावर त्याने मी गाडी परत घेऊन गेलो आहे. अजून जास्तीचे पैसे पाहिजे, तरच मी तुमची गाडी परत देतो, पैसे दिले नाही तर गाडीचा नंबर बदलून गाडी मी दुसर्याला विकुन टाकीन, असे बोलून तो गाडीचा अपहार करुन घेऊन गेला आहे. पोलीस हवालदार गोरे तपास करीत आहेत.
