Pune Crime News | पुणे : “मी इथला भाई आहे, तुला माहिती नाही का?” पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण; घराची काच फोडून दहशत पसरविणार्या सराईत गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे : Pune Crime News | आजीबरोबर औषध घेण्यासाठी जाणार्या तरुणाला अडवून सराईत गुन्हेगाराने पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने गुन्हेगाराने त्याला मारहाण करुन घराच्या खिडकीची काच फोडून दहशत निर्माण केली. खडकी पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याचा साथीदार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
सिद्धार्थ योगेश चव्हाण Siddharth Yogesh Chavan (वय २५, रा. बोपोडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सिद्धार्थ चव्हाण याच्याविरुद्ध मारामारी करणे, खंडणी उकळणे असे ६ गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. आकाश महादेव अहीवळे (वय २५, रा. पवळे गिरणीजवळ, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ६ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी यांच्या घराबाहेर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश अहीवळे व त्यांची आजी तानुबाई तुकाराम पारसे हे मोटारसायकलवरुन औषध आणण्यासाठी गोविंद मेडिकल येथे जात होते. यावेळी सिद्धार्थ चव्हाण यांच्याजवळ आला. त्याने आकाश यांच्याकडे खर्चासाठी हजार रुपये मागितले. तेव्हा आकाश याने तुला मागे दोन वेळा पाचशे रुपये दिले होते. पण आता माझी आजी माझ्यासोबत आहे. तु मला जाऊ दे, असे म्हणाला. त्यावर सिद्धार्थ चव्हाण याने ‘‘का रे तू जास्त शहाणा झाला का?. मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का?’’ असे म्हणून त्यांच्या खिशात हात घालू लागला. आकाश यांनी त्याचा हात झटकल्यावर त्याने आकाश याच्या कानाखाली दोनदा चापट मारली.
हातातील कडे काढून त्याने आकाश यांच्या डोळ्यावर व कानाचे खाली मारुन जखमी केले. आकाश यांचा काका त्यांना सोडविण्यासाठी आले असताना अल्पवयीन मुलाने त्यांना ठोसा मारुन जखमी केले. सिद्धार्थ चव्हाण याने लोखंडी हत्याराने घराच्या खिडकीची काच फोडून हवेत फिरवुन जमलेल्या लोकांकडे बघून‘‘तुमच्या सर्वांची आकाशसारखी अवस्था करुन टाकीन’’ असे म्हणून दहशत पसरवली. त्यामुळे लोक निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. घटनेनंतर २ तासातच सिद्धार्थ चव्हाण याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्ता गुळींग तपास करीत आहेत.
