Pune Navratri Women’s Festival | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे; सोमवारी (दि. 12) नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते उद्घाटन, अनुराधा ओक आणि प्रियांका इंगळे यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार
महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
पुणे : Pune Navratri Women’s Festival | महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे यंदा २८ वे वर्ष असून , यंदा दिनांक १२ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हा महिला महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.०० वाजता नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते होणार असून, विशेष कामगिरीबद्दल दिला जाणारा तेजस्विनी पुरस्कार, यंदा ६०वे साजरे करणाऱ्या बालभारती संस्थेच्या संचालिका अनुराधा ओक आणि पहिल्या महिला खो-खो वर्ल्ड-कप स्पर्धेत अजिंक्य पद मिळवणाऱ्या भारतीय महिला खो-खो संघाची कप्तान प्रियांका इंगळे यांना तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. ५,००० रुपये, सन्मानचिन्ह, देवीची प्रतिमा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच या कार्यक्रमात १५० हून अधिक गुरुजनांचा स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. या महिला महोत्सवात रोज महिलांसाठी विविध स्पर्धा व अन्य कार्यक्रम आयोजित होतील अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी दिली. पुणे नवरात्रौ महोत्साचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांच्या प्रेरणेतून हा महिला महोत्सव गेले २८ वर्ष चालू आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
तेजस्विनी पुरस्काराच्या मानकरी अनुराधा ओक या बालभारती संस्थेच्या संचालिका आहेत. ‘बालभारती’ ही महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम तयार करणारी शासनाची मुख्य संस्था आहे. बालभारती तर्फे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, सिंधी व गुजराती अशा ८ भाषांमध्ये दरवर्षी कोट्यावधी पुस्तके प्रकाशित व वितरीत होतात. ‘बालभारती’चा हा अवाढव्य पसारा समर्थपणे सांभाळणाऱ्या बालभारतीच्या संचालिका सौ. अनुराधा ओक यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांनी पुणे डीव्हीजनल बोर्डच्या उपसंचालिका, एस.एस.सी. व एच.एस.सी.बोर्डच्या सचिव, एस.सी.ई.आर.टी च्या संयुक्त सचिव, महाराष्ट्र स्टेट काउंसील ऑफ एक्झामिनेशनच्या आयुक्त ही पदे भूषवली आहेत.
प्रियांका इंगळे यांनी मागील वर्षी सन २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे पहिली महिला खो-खो वर्ल्ड-कप स्पर्धा भारतीय महिला खो-खो संघाने जिंकली. प्रियांका इंगळे त्याच्या कप्तान होत्या. या पहिल्या महिला खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत ३२ देशांचे महिला खो-खो संघ सहभागी झाले होते. प्रियांका इंगळे यांच्या कुशाल नेतृत्वामुळे भारतीय महिला खो-खो संघ विजेतेपदाची ही कामगिरी करू शकला. त्याबद्दल त्यांना ‘तेजस्विनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांनी २३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी भारतीय महिला खो-खो संघात सातत्याने विशेष कामगिरी करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिला खो-खो संघास १८ सुवर्णपदके, ३ रौप्यपद्के व दोन कांस्यपदके मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. सध्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून त्या काम करीत आहेत.
या महिला महोत्सवात महिलांसाठी पारंपारिक नववधू मेक-अप स्पर्धा, श्री. विष्णू सहस्त्रनाम व श्री. सुक्तपठण, पाककला स्पर्धा, कन्या पूजन, एक मिनिट स्पर्धा, महाआरती अशा स्पर्धा व कार्यक्रम होणार असून या काळात कन्यापूजन आणि महाआरतीमध्ये विशेष लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे . स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिले जातील तसेच सहभागी सर्व महिलांना आकर्षक भेट वस्तू दिल्या जातील.
या महिला महोत्सवाचा उद्घाटन सोहळा , सर्व स्पर्धा व विशेष कार्यक्रम श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे होणार आहे. यासाठी महिलांची नावनोंदणी सुरु असून इच्छुक महिलांनी सौ . जयश्री बागुल , माजी उपमहापौर आबा बागुल यांचे कार्यलय ओटा क्रमांक १२, शिवदर्शन, पुणे येथे अथवा ९८८१७३७२४६ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क करावा असे आवाहन पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या आयोजिका अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी केले आहे.
