Pune Crime News | पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गेल्या 6 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्या गुन्हेगाराला वडगाव बुद्रुकमध्ये सापळा रचून अटक
पुणे : Pune Crime News | टोळक्याने तिघांवर हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा करुन गेली ६ वर्षे पोलिसांना गुंगारा देणार्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने वडगाव परिसरात पकडले.
सुधीर बुद्धीराम विश्वकर्मा Sudhir Buddhiram Vishwakarma (वय ३१, रा. टेल्को कॉलनी, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुजित व्यंकट धाकडे (वय २३, रा. दत्तनगर, कात्रज) व त्यांचे मित्र सोहेल आसंगी, आदित्य कांबळे, किरण माने हे नर्हे येथील हॉटेल मैत्री कट्टा येथे १३ मार्च २०२० रोजी दुपारी साडेतीन वाजता जेवणासाठी गेले होते. पूर्वी सोहेल आसंगी याने मारहाण केल्याच्या कारणावरुन अक्षय शिंदे, दीपक वैद्य, सुधीर विश्वकर्मा, दीपक लाड, शुभम जांबळे, सनी मोरे (सर्व रा़ टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज) यांनी चौघांना हाताने, कोयत्याने व विटांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या सर्वांवर दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुधीर विश्वकर्मा हा फरार होता.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस अंमलदार पांडुरंग शिंदे आणि तुषार किंद्रे हे सिंहगड रस्ता परिसरात गस्त घालत होते. विश्वकर्मा हा वडगाव बुद्रुक भागात आला असल्याची माहिती शिंदे आणि किंद्रे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पंढरीनाथ शिंदे, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला, आशिष राठोड यांनी केली.
