Pune Crime News | विवाहितेच्या मानसिक त्रासातून रिक्षाचालक तरुणाने गळफास घेऊन संपविले आपले जीवन, महिलेविरुद्ध खडक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याने मानसिक तणावातून रिक्षाचालक तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. खडक पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

गणेश अशोक हलवाई (वय २४, रा. घोरपडी पेठ) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची बहिण कोमल निलेश सोनवणे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) हिने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्वप्नाली संतोष तावरे Swapnali Santosh Taware (वय ३२, रा. गोरेगाव, महाड, रायगड) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना घोरपडी पेठेतील राहत्या घरी २ मे रोजी पहाटे घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हलवाई हा रिक्षाचालक असून तो आई वडिलासह रहात होता. त्यांच्या शेजारी स्वप्नाली संतोष तावरे यांच्या घरी तुळजापूरचे देवीचे देवस्थान आहे. घरातील धार्मिक कार्यक्रम असल्यास गणेश हलवाई हा दर्शनासाठी जात होता. त्यातून त्याची स्वप्नाली हिच्याशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे नातेवाईकांना समजले. त्यातून हलवाई व स्वप्नालीच्या पतीचा वाद झाला होता. तेव्हा स्वप्नाली ही घर सोडून महाडला गेली होती. तिला सोडायला गणेश गेला होता. तेथे दोन दिवस राहून तो परत आला. तेव्हा त्याने आपल्या बहिणीला सांगितले की, स्वप्नालीच्या पतीने मला मारण्यासाठी सापळा लावला आहे. मी दोन दिवस तुझ्याकडे रहायला येत आहे. दोन दिवसांनी घोरपडी पेठेतील घरी दोघांचे नातेवाईक, वस्तीमधील मंडळाचे कार्यकर्ते जमले. त्यांनी  हा विषय मिटविला. दोघांनी एकमेकांशी बोलायचे नाही, असे ठरले होते. तरीही गणेश व स्वप्नाली हे अधून मधून एकमेकांशी फोनवर बोलत होते. तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला न बोलण्याविषयी बजावले. तेव्हा त्याने सांगितले की, मी फोन करत नाही. तिचाच फोन येतो़ आणि मी फोन बंद केला की, तुला खोट्या बलात्काराच्या केसमध्ये अडकवील किंवा मी जीव देईल, अशी धमकी देत आहे, ती सारखी मला मानसिक त्रास देत असल्याचे तो सांगत होता.

३० एप्रिल २०२६ रोजी स्वप्नाली हिच्या लग्नाचा वाढदिवस होता. तिने लग्नातील पतीपत्नीचा फोटो व्हॉटसअ‍ॅप स्टेटसला ठेवले होते. म्हणून गणेश व स्वप्नाली यांच्यात फोनवरुन वाद चालू होता. ते दोघे गोव्याला जाऊन ४ दिवसांनी लग्न करणार असल्याचे ठरलेले होते, हे वडिल व बहिणीने ऐकले होते. १ मे रोजी रात्री स्वप्नाली तावरे हिच्याशी गणेश रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत होता. तो मानसिक तणावामध्ये असल्याप्रमाणे घरातून बाहेर व बाहेरुन आतमध्ये ये जा करीत होता. रात्री उशिरापर्यंत तो झोपला नव्हता. २ मे रोजी सकाळी ७ वाजता त्याची आई मिना हलवाई घर उघडण्यासाठी गेली. तेव्हा गणेश हलवाई याने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. गणेश हलवाई यांच्यावर अंत्यसंस्कारानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक ताळीकोटे तपास करीत आहेत.

You may have missed