IAS Officer Tukaram Mundhe | भेसळ आणि बनावट औषधांविरोधात तुकाराम मुंढेंचा मोठा ‘डिजिटल’ धडाका; आता थेट इंस्टाग्रामवर करता येणार तक्रार
मुंबई : IAS Officer Tukaram Mundhe | अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच शिस्तप्रिय आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे. केवळ मैदानावर धाडी टाकून न थांबता आता त्यांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ, बनावट औषधे, बनावट सौंदर्य प्रसाधने (कॉस्मेटिक्स) आणि औषध बाजारातील गैरव्यवहारांविरोधात नागरिकांना थेट सोशल मीडियावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी नागरिकांनी थेट अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर थेट तक्रारी पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी तक्रार करताना संबंधित गैरव्यवहाराची अर्धवट माहिती न देता, अचूक आणि पुरेशी माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून प्रशासनाला तातडीने तपास करणे शक्य होईल. योग्य पुराव्यांसह मिळालेल्या तक्रारींवर स्थानिक प्रशासन आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या समन्वयाने त्वरित व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास या सोशल मीडिया मोहिमेद्वारे देण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच अवघ्या तीन ते चार दिवसांत राज्यभरात ५३ हून अधिक ठिकाणी धाडी टाकून अभूतपूर्व कारवाई केली आहे. नागपूरसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, आणि जळगावमध्ये गुटखा, कृत्रिम दूध, रसायने वापरून पिकवलेले आंबे आणि निकृष्ट बाटलीबंद पाण्यावर जप्तीची कारवाई करत ३३ हून अधिक जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आता या डिजिटल मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांना थेट आयुक्तांपर्यंत पोहोचणे सोपे झाले असून, भेसळखोर आणि बनावट औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
