Pune Crime News | डेक्कन जिमखान्यावरील फ्लाईंग  जिप्सीमध्ये पहाटे 4 वाजता पुन्हा राडा; कोयत्याने वार केल्याने तरुण गंभीर जखमी

Crime

पुणे : Pune Crime News | सातत्याने पहाटेपर्यंत कॅफे उशिरा ठेवल्याने वादात सापडलेल्या डेक्कन जिमखाना येथील फ्लाईंग  जिप्सी या कॅफेवर १५ ऑगस्टच्या पहाटे ४ वाजता पुन्हा राडा झाला. त्यात एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अथर्व जगताप (वय १९) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

फ्लाईंग  जिप्सी हा नेहमी पहाटेपर्यंत सुरु असल्याच्या वारंवार तक्रारी पोलिसांकडे येत असतात. शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेपेक्षा उशिरापर्यंत कॅफे सुरु ठेवल्याबद्दल गेल्या वर्षी २०२५ मध्ये २ खटले दाखल करण्यात आले होते. या वर्षी २०२६ मध्ये आतापर्यंत ६ खटले दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी फ्लाईंग जिप्सी कॅफे उशिरापर्यंत सुरू ठेवल्याने तेथील काऊंटरवरील कप पोलीसाने  काठीने खाली पडल्याने पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांना २९ जून २०२६ रोजी निलंबित केले होते. या घटनेची सत्यता तपासल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. या कॅफेमध्ये सातत्याने वादविवाद होत असते  व ते उशिरापर्यंत चालू  राहत असते.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी हे कॅफे पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु होते. तेथे अनेक तरुण तरुणी ये जा करीत होते. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रिल्सवर लाईफ आणि कॉमेंट करण्यावरुन झालेल्या वादात कॅफेमध्ये वाद होऊन त्यात अथर्व जगताप याच्यावर कोयत्याने वार  करण्यात आले. या घटनेत ८ ते १० जणांचा समावेश असून त्यात २ तरुणींचा समावेश आहे. या घटनेत अथर्व जगताप हा  गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी सांगितले की, पोलीस हॉस्पिटलमध्ये गेले असून जखमी अजूनही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.