Pune Crime News | मोबाईलमधील डाटा डिलिट झाल्याने तरुणाला मारहाण करणार्या भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | व्हिडिओ एडिट करीत असताना मोबाईलमधील डाटा डिलिट झाल्याने तरुणाला मारहाण करुन करणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत क्षितीज सागर पवार (वय २०, रा. साई कॉम्प्लेक्स, तपकीर गल्ली, बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पृथ्वीराज गजानन पंडीत Prithviraj Gajanan Pandit (वय ३०, रा. तपकीर गल्ली, बुधवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तपकीर गल्ली आणि नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकात २९ सप्टेंबर रोजी साडेबारा वाजता घडली. फरासखाना पोलिसांनी पृथ्वीराज पंडीत यांना अटक करुन जामीनावर सोडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्षितीज पवार यांनी व्हिएफएक्स अॅनिमेशन पदवी प्राप्त केली आहे. ते लोकांचे व्हिडिओ एडिट करुन देतात. त्यांनी गणेशोत्सवापूर्वी पृथ्वीराज पंडीत यांचे वैयक्तिक कामाचे व्हिडिओ एडिट करुन दिले होते. त्याचे पैसे त्यांनी दिले नव्हते. २८ सप्टेंबर रोजी पृथ्वीराज पंडीत यांनी क्षितिज पवार यांना फोन करुन कसबा गणपती कमानीजवळ बोलावून घेतले. त्यांनी पैसे मागितल्यावर एक व्हिडिओ एडिट करायला दिला. त्यांच्या अॅपल मोबाईलवर व्हिडिओ एडिट करत असताना नजरचुकीने त्यांचा मोबाईल फॉरमॅट झाला होता. पृथ्वीराज पंडीत रागावतील, म्हणून त्यांनी त्यांना मोबाईल फोन देऊन ते रात्री दीड वाजता घरी निघून गेले होते.
दुसर्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पृथ्वीराज पंडीत हे पवार यांच्या घरी आले. माझा मोबाईल फॉरमॅट का केला असे म्हणून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करुन लागले. घराच्या दरवाज्याजवळ असलेली तांब्याची बाटली घेऊन डोक्यात मारली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी पवार यांनी आपण जे एम रोडवर जाऊन डाटा रिकव्हर करुन घेऊ, असे सांगितले. ते दुकानात गेले. तेथे डाटा रिकव्हर झाला नाही. तेथून ते पत्र्या मारुती चौकात आले. तेथील दुकानदाराने थोडा वेळ लागेल, असे सांगितले. त्यावर पृथ्वीराज पंडीत याने चिडून दुकानाचे बाहेर येऊन बाजुला पडलेला लाकडी बांबु घेऊन त्याने पवार यांना मारहाण केली. तेथून ते परत घरी आले. तेव्हाही त्यांनी पुन्हा मारहाण केली. क्षितीज पवार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पृथ्वीराज पंडीत यांच्यावर यापूर्वी विना परवाना दहीहंडी साजरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे तपास करीत आहेत.
