Pune Crime News | रॉयल इनफिल्ड बुलेट विक्रीचा वादा करुन खरेदी विक्री करणार्या व्यावसायिकाला घातला 1 लाख 10 हजारांचा गंडा
पुणे : Pune Crime News | ओ एल एक्सवर जाहिरात करणार्यास रॉयल इनफिल्ड बुलेटची चांगली रक्कम मिळवुन देतो, असे सांगून एकाने जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करणार्या व्यावसायिकाला तब्बल १ लाख १० हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याबाबत भाग्येश राजेंद्र झोरी (वय २४, रा. बहिरटवाडी, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिनेश वर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील तुळजाभवानीनगरमधील अर्बन निर्वाणा सोसायटीत २३ व २४ जुलै रोजी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्येश झोरी यांचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना २३ जुलै रोजी सायंकाळी दिनेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यांना इनफिल्ड बुलेट विक्री करावयाची आहे, असे सांगून त्यांनी गाडीचे फोटो व तिची माहिती पाठविली. आर सी मध्ये नावात फरक असल्याचे विचारल्यावर मी सेंकड ओनर असल्याचे त्याने सांगितले.
दीड लाख रुपयांना विकणार असल्याचे सांगितले. २४ जुलै रोजी ते खराडी येथील तुळजाभवानी नगरमध्ये गाडी पाहण्यास गेले. तेथे गेल्यावर विक्रांत भारद्वाज हा येईल, असे त्यांना दिनेश वर्मा याने सांगितले. त्याप्रमाणे विक्रांत भारद्वाज आला. त्यांनी गाडी चालवुन टेस्ट केली. गाडीच्या मुळ सामानाची मागणी केली. भारद्वाज याने ते सर्व सामान आणून दिले. गाडीचा मुळ मालक खत्री असून ते कामात व्यस्त असल्याचे सांगितले. जो काही व्यवहार असेल तो दिनेश वर्मा यांच्याशाी करा, असे विक्रांत भारद्वाज यांनी सांगितले. त्यांनी पुन्हा दिनेश वर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी गाडीची कागदपत्रे व्हॉटसअॅपवर पाठवली. गाडी १ लाख ३० हजार रुपयांना घेण्याचे ठरले. दिनेश याने वडिल हॉस्पिटलमध्ये आहेत़ पैशांची गरज आहे, असे सांगितले. त्यांनी पाठविलेल्या स्कॅनरवर त्यांनी १ लाख १० हजार रुपये पाठविले. कागदपत्रे असलेला माणूस दिल्लीला गेला आहे.
२ ते ३ दिवसात मुळ कागदपत्रे मिळून जाईल, असे सांगितले. उरलेले २० हजार रुपये नंतर देणार असल्याचे सांगितले. टी टी फॉर्मवर कोठे कोठे सह्या हव्यात आहेत, याची विचारणा करुन सह्या तो स्वत: घेऊन येतो, असे विक्रांत याने सांगितले. विक्रांत याने सह्या घेतल्या असून उरलेले पैसे पाठविल्यावर तो टी टी फॉर्म देईल, असे दिनेश याने सांगितले. विक्रांत याने गाडी देण्यास नकार दिला. तेव्हा फिर्यादी यांनी पोलिसांना बोलावले. विक्रांत भारद्वाज यांनी सांगितले की, बुलेट गाडीच्या मालकाचा मित्र आहे. गाडी विक्रीसाठी ओ एलएक्स वर अपलोड केली होती. त्यानंतर दिनेश वर्मा याच्याबरोबर त्यांची ओळख झाली. दिनेश वर्मा हा विक्रांत भारद्वाज यांचा मित्र वगैरे नाही. दिनेश वर्मा याने बुलेटला चांगली किंमत मिळवुन देतो, असे सांगितले. त्यामुळे दिनेश वर्मा याच्या सुचनेनुसार विक्रांत भारद्वाज हा पुढील कार्यवाही करत होता. दिनेश वर्मा याला पाठविलेल्या १ लाख १० हजार रुपयांपैकी एक रुपयाही गाडीचे मुळ मालकास अगर आपल्याला आले नसल्याचे विक्रांत याने सांगितले. दिनेश वर्मा याने आपली दिशाभूल केल्याचे लक्षात आल्यानंतर आता फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.
