Pune Crime News | बेकायदेशीर सावकारी करुन बांधकाम व्यावसायिक अमित गोयल यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करणार्या चौघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | व्यावसायासाठी व्याजाने देण्याचा वैध परवाना नसताना व्याजाने पैसे देऊन बनावट व्यक्तीला उभे करुन कुलमुखत्यारपत्र तयार करुन फसवणुक केली. गोयल गंगा या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे अमित गोयल यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करणार्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय तुकाराम रौंदळ Vijay Tukaram Raundal (वय ५८, रा. मॅनहॅटन सोसायटी पल्लोड फार्म, बाणेर रोड), अभी विजय रौंदळ Abhi Vijay Raundal (वय ३३, रा. तिर्थ टेक्नो स्पेस, बाणेर), देवेंद्र ललितकमार शहा Devendra Lalitkumar Shah (रा. गंगा टेरेस, मुंढवा रोड), उमेहानी एम दाभोईवाला Umehani M. Dabhoiwala (रा. ग्रीनलान्स, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अमित जयप्रकाश गोयल (वय ४४, रा. सनमाहु कॉम्प्लेक्स, बंडगार्डन रोड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या कार्यालयात झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याकडे कोणताही व्याजाने पैसे देण्याचा वैध परवाना नाही. असे असताना त्यांनी १२ कोटी ४० लाख रुपये ९ टक्के वार्षिक व्याजाने फिर्यादी यांच्या गोयल गंगा इंडिया या कंपनीला कर्जापोटी दिली होती. फिर्यादी यांनी कर्जाच्या सुरक्षा पोटी कंपनीचे मालकीचे ६०८५ चौरस मीटर क्षेत्र सब रजिस्टार हवेली यांच्या कार्यालयात साठे खत दस्त आरोपीच्या नावाने लिहून दिले होते. परंतु, कालांतराने विजय रौंदळ याने फिर्यादी यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून दरमहा ४.१६ टक्के म्हणजे वार्षिक ४९.९२ टक्के प्रमाणे रक्कम ६० कोटी ७८ लाख रुपये इतक्या खंडणीवजा रक्कमेची बेकायदेशीर मागणी केली.
ही खंडणी वजा रक्कम दिल्यानंतर हे साठेखत रद्द करुन देतो, असे त्याने सांगितले होते. तसेच आरोपीला या कुलमुखत्यारपत्रात इतर कोणासही अधिकार तबदील करण्याबाबत कोणतेही हक्क व अधिकार दिलेले नव्हते. असे असताना खरेदी खत विजय रौंदळ याच्या नावाने दुय्यम निंबंधक हवेली यांच्या कार्यालयात देवेंद्र ललीतकुमार शहा याला फिर्यादी यांच्या वतीने उभे करुन नोंदणी करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच फिर्यादी यांची मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशाने आरोपीने या मिळकतीचे लेटर ऑफ इंटेन्ट, टर्म शीट तयार करुन देवेंद्र शहा याच्याकडून ३ कोटी रुपये विजय रौंदळ याने स्वीकारले. त्याविरोधात फिर्यादी यानी चौघांविरुद्ध न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करीत आहेत.
