Pune Crime News | कायदेशीर प्रक्रिया करुन दुकान खरेदी केले असताना बनावट समझोता करार तयार करुन पोलिसांकडे खोटा तक्रार अर्ज करणार्या चौघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | शिवनेरी कामधेनु इस्टेट येथील दुकान सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन खरेदी केले होते. असे असताना बनावट समझोता करार तयार करुन स्टॅम्पपेपवर जुन्या तारखेचा करार झाल्याचे दाखवुन पोलिसांकडे खोटा तक्रार अर्ज करण्यात आला़ बदनामी व्हावी, गुन्हा दाखल व्हावा, यासाठी हा सर्व खटाटोप करणार्या चौघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहिती अधिकारात माहिती काढून एका ज्येष्ठाने हा प्रकार समोर आणला आहे.
याबाबत राजेंद्र केशवराव मोकाशी (वय ५९, रा. ललिता महाल सोसायटी, बाणेर रोड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी केदार माधव बिडवाई (Kedar Madhav Bidwai), गजानन बिडवाई, तुषार सुदाम पायगुडे (Tushar Sudam Paygude), विनोद रमेश कुलकर्णी (Vinod Ramesh Kulkarni) तसेच बनावट सही करणारे आणि जुन्या तारखेचा स्टॅम्प पेपर देणारे स्टॅम्प व्हेंडर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शिवनेरी कामधेनु इस्टेट येथे २५ मे २०२२ ते मे २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ज्योतिरादित्य मोकाशी याचे नावावर २५ मे २०२२ रोजी शिवनेरी कामधेनु इस्टेट येथील सुमारे २३५ चौरस फुट क्षेत्रफळाचे दुकान १८ लाख रुपयांना कायदेशिररित्या खरेदी केले. खरेदी करताना पेपर नोटीस देऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करुन व्यवहार केला. त्यानंतर मे २०२५ मध्ये केदार बिडवाई याने फिर्यादी व त्यांच्या मुलाविरुद्ध सावकारी व्यवहारातून दुकान खरेदी केले. दमदाटी केली, असे खोटे आरोप करुन पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला.
त्यात ज्योतिरादित्य राजेंद्र मोकाशी व केदार बिडवाई यांच्यामध्ये २०२२ मध्ये समझोता करार झाल्याचे दर्शविणारा करार जोडण्यात आला होता. या अर्जाची दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने चौकशी केली. त्यात तथ्य आढळून न आल्याने त्यांनी हा अर्ज सरकारदफ्तरी दाखल केला होता. फिर्यादी यांनी माहिती अधिकाराअंतर्गत सर्व कागदपत्रे प्राप्त केली. त्यात केदार बिडवाई याने सादर केलेला कथित समझोता करार हा पूर्णपणे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्या करारावर फिर्यादी यांचा मुलगा ज्योतिरादित्य मोकाशी यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. समझोता करारासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर २०२५ साली वापरला. परंतु, समझोता करार २०२२ सालचा असल्याचे दर्शविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. केदार बिडवई याने पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज करताना कराराची केवळ झेरॉक्स प्रतच सादर केली. मुळ कागदपत्रांची तपासणी होऊ नये, तसेच त्यातील बनावटपणा उघड होऊ नये, म्हणून मुळ कागदपत्रे स्वत:कडे ठेवली.
फिर्यादी यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून केदार बिडवई व विनोद रमेश कुलकर्णी यांच्यामध्ये झालेले बँक व्यवहार दाखविण्यात आले. वास्तविक त्या दोघांच्या व्यक्तीगत व्यवहारामध्ये फिर्यादी यांचा काही संबंध नव्हता. फिर्यादी व त्यांच्या मुलाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल व्हावा, त्यांची बदनामी व्हावी, स्वत:चा कायदेशीर फायदा व्हावा, या उद्देशाने आरोपींनी हे कृत्य केले. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड तपास करीत आहेत.
