Pune Crime News । सिमेंट सीट तुटल्याने टेरेसवरुन पडून महिलेचा मृत्यु प्रकरणी न्युकलेस मॉलचे व्यवस्थापन, एक्सप्रेस हाऊस किपर कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News । पोलीस आयुक्तालयासमोरील न्युकलेस मॉलच्या टेरेसची सफाई करत असताना सिमेंट सीट तुटल्याने त्यावरुन खाली पडून महिलेचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्यामुळे बंडगार्डन पोलिसांनी न्युकलेस मॉलचे व्यवस्थापक व एक्सप्रेस हाऊस किपर कंपनीचे व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल केला आहे.

रेश्मा  महबुब इनामदार (वय ४४, रा. सदानंदनगर सोसायटी, मंगळवार पेठ) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना न्युकलेस मॉलच्या टेरेसवर प्लंबिंग डकमध्ये ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली. याबाबत अलताफ मेहबुक इनामदार (वय २९, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई रेश्मा इनामदार या न्युक्लेस मॉल येथे एक्सप्रेस हाऊस किपर प्रा़ लि़ यांच्याकडे गेली १२ वर्षांपासून हाऊसकिपिंगचे काम करतात. रेश्मा यांना सुपरवायझर आशपाक याने दुपारनंतर मॉलच्या टेरेसवरील कचरा काढण्यास सांगितले. सायंकाळी साडेचार वाजता प्लम्बिंग डकवरील सिमेंटचा सीटवरील कचरा त्या काढत होता. त्यावेळी अचानक सिमेंटचे सीट तुटल्याने त्या डकमधून खाली पडल्या. तेथे जमलेल्या लोकांनी तिला वाहनाने ससून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे जाहीर केले.

न्युक्लेस मॉलच्या व्यवस्थापकाने तसेच एक्सप्रेस हाऊसकिपर कंपनी यांनी न्यूक्लेस मॉलच्या टेरेसवर प्लंबिंग डकमध्ये सिमेंटचे सीट निष्काळजीपणे लावले आहे. त्यास सुरक्षा व्यवस्था केली नव्हती. टेरेसवर साफसफाई करण्याकरीता कोणत्याही प्रकारची सेप्टी साधने दिली नाही. त्यामुळे तिच्या मृत्युस न्यूक्लेस मॉलचे व्यवस्थापन व एक्सप्रेस हाऊसकिपर कंपनीचे व्यवस्थापक कारणीभूत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

You may have missed