Pune Crime News | प्रेशर मीड टॉप साऊंडमध्ये वापरणार्‍या पांगुळआळी दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षासह साऊंड सिस्टीम मालकावर गुन्हे दाखल, 4 टॉप साऊंड फरासखाना पोलिसांनी केले जप्त

Crime

पुणे : Pune Crime News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रेशर मीड साऊंडमध्ये वापरण्यास मनाई केली असतानाही प्रत्येक साऊंडमध्ये ६ प्रेशर मिड वापरणार्‍या गणेश पेठेतील पांगुळआळी दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष व साऊंड सिस्टिम मालकावर फरासखाना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. २ लाख रुपयांचे ४ टॉप साऊंड पोलिसांनी जप्त केले आहेत.

विजय सुरेश सुतार Vijay Suresh Sutar (वय ४०, रा. पांगुळ आळी, गणेश पेठ), रिच ऑडिओ सिस्टीमचे मालक नरसिंह राम रेड्डी Narasimha Ram Reddy(वय ३२, रा. नवी सांगवी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार संदीप गणपत धनवटे (वय ४०) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश पेठेतील पांगुळआळी चौक येथे शनिवारी दुपारी चार वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सव मंडळांना डी जे साऊंड सिस्टीम, प्लाझ्मा, प्रेशर मिड साऊंड सिस्टिम तसेच लेजर लाईट, फटाके न वापरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. फिर्यादी, सहायक पोलीस निरीक्षक लोणकर, पोलीस हवालदार दुधाळ, होमगार्ड शर्मा इत्यादी दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत पांगुळआळी  येथे आले. तेथे चार बेस व चार टॉप अशी साऊंड सिस्टिम लावलेली होती. या साऊंड सिस्टिममध्ये प्रेशर मिडचा वापर करण्यात आला आहे का, याबाबत मंडळाचे अध्यक्ष विजय सुतार यांच्याकडे विचारणा केली.

संशय आल्याने साऊंड सिस्टीमच्या मालकाला बोलविण्यात आले. रिच ऑडिओ सिस्टीमचे मालक नरसिंह रेड्डी  आले. त्यांनी चार टॉपमध्ये प्रत्येकी २ प्रेशर मिड लावण्यात आले असल्याचे सांगून ते सध्या बंद करुन ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. त्यातील एक टॉप खोलून त्यातील प्रेशर  मिड  दाखविला असता त्याची संख्या ६ असून ते गोलाकार आकाराचे असून ते साऊंड सिस्टीममधील आवाज जास्त प्रमाणात वाढविण्याचे काम करत असल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे प्रेशर मिड वापरण्यास मनाई असताना त्यांनी त्याचा वापर केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन हे प्रेशर मिड वापरलेले ४ ही टॉप जप्त केले. दहीहंडी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच दुपारी ही कारवाई करण्यात आली.

कोथरुड येथील दहीहंडी उत्सवात डॉल्बी सिस्टिमचा वापर करुन आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍या अखिल बंजारा समाज मंडळाच्या अध्यक्ष व स्पिकर चालकावर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अखिल बंजारा समाज मंडळ, शिवतीर्थनगरचे अध्यक्ष राहुल किसन कटरावत Rahul Kisan Kattaravat (वय ३२, रा़ सुतारदरा, कोथरुड), स्पिकरचालक चिरंजीवी भिंगरे (रा. कालीदास ऑडिओ, रायगड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवतीर्थनगर येथील सार्वजनिक रोडवर दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान डॉल्बी सिस्टिमचा वापर करुन आवाजाची मर्याद ओलांडली असल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात  आली. पोलीस उपनिरीक्षक वटपलवाड तपास करीत आहेत.

You may have missed