Pune Crime News | पुणे : वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; ११ लाखांचे हेरॉइन जप्त, दोघांना अटक
पुणे : Pune Crime News | वाघोली पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत हेरॉइनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ११ लाख ३८ हजार ९०० रुपये किमतीचे ३२ ग्रॅम ५४० मिलीग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्यांची नावे शिव कालूसिंह (वय ३३, रा. बालाजीनगर, वाघोली) आणि मांगीलाल (रा. आकुर्डी) अशी आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस फौजदार बाबासाहेब मोराळे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रात्री केसनंद परिसरात नाकाबंदी सुरू असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या ताब्यातून हेरॉइनचा साठा आढळून आला.
चौकशीदरम्यान संबंधित आरोपीने हा अमली पदार्थ आकुर्डी येथील एका व्यक्तीकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पुढील तपासात दोघांचाही अमली पदार्थांच्या विक्री व पुरवठ्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.
