Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून आखाड पार्टीत चौघांनी डोक्यात मोठा दगड घातल्याने तडीपार गुंड रक्तभंबाळ; तडीपार गुंडावरही गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | आखाड पार्टीसाठी जेवण बनवित असताना पूर्ववैमनस्यातून तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या गुंडासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पियुष ऊर्फ युवराज गणेश भिसे (वय २२, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कार्तिक अनिल जाधव Kartik Anil Jadhav (वय २३), प्रज्वल संदीप शिंदे Prajwal Sandeep Shinde (वय २४), नरेश ससाणे (वय २०), दादा पाखरे (वय २४, रा. लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोणी गावातील महादेव मंदिराच्या पाठीमागील शेडमध्ये रविवारी ९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज भिसे हा रिक्षाचालक आहे़ त्याला ३ महिन्यांपूर्वी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त यांनी तडीपार केले आहे़ तेव्हापासून तो नांदेड येथे मित्रासोबत रहात होता़ ७ ऑगस्ट रोजी त्याच्या आईचा फोन आला. माझी प्रकृती ठीक नाही, एकदा येऊन भेटून जा, असे आईने सांगितले. त्यावरुन तो ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात आला. आईची भेट घेऊन घरी थांबला होता. त्यावेळी त्यांचे मामा कृष्णा म्हात्रे यांनी आम्ही रविवारी आखाड पार्टी करत आहे. तू ये असे सांगितले. त्याप्रमाणे तो रविवारी सकाळी महादेव मंदिराच्या पाठीमागील शेडमध्ये गेला. तेथे जेवण बनविण्याचे काम सुरु होते. त्यांना युवराज भिसे मदत करत होता. त्यावेळी कार्तिक जाधव, प्रज्वल शिंदे, नरेश ससाणे, दादा पाखरे तेथे आले. जुना राग मनात धरुन चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कार्तिक जाधव याने तेथे पडलेला दगड घेऊन डोक्यात मारुन जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या बाळा भांड यालाही चौघांनी मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तडीपारीचा भंग करुन आलेल्या युवराज भिसे याला कोयत्यासह पकडले. याबाबत पोलीस हवालदार आण्णा माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी युवराज भिसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
युवराज भिसे हा विना परवानगी तडीपारीचा भंग करुन शहरात आला. जखमी अवस्थेत मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन हातामध्ये कोयता घेऊन शिवीगाळ करताना मिळून आला. पोलीस हवालदार शिंदे तपास करीत आहेत.
