Pune Crime News | पत्नी, मुलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने विष पिऊन संपविले जीवन; खडक पोलिसांनी जादुटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल करुन पत्नी, दोन मुलांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पहिल्या पत्नीशी घटस्फोटानंतर दोन मुले असलेल्या महिलेशी त्याने लग्न केले. परंतु, त्यांची  फक्त पैशांवर नजर होती. ते जादुटोणा करुन त्याला त्रास देत होते, या कारणावरुन तरुणाने विष पिऊन आपले जीवन संपविल्याचा प्रकार समोर आला आहे.

राजीव मनोहर पायगुडे (वय ५३, रा. शुक्रवार पेठ) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचे भाऊ रवींद्र मनोहर पायगुडे (वय ५५, रा. बिबवेवाडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल करुन मनिषा ऊर्फ मंगल राजीव पायगुडे Manisha alias Mangal Rajiv Paygude (वय ४०), स्मृती राजीव पायगुडे Smruti Rajiv Paygude (वय २४) आणि रोहित राजीव पायगुडे Rohit Rajiv Paygude (वय २२, सर्व रा. मांडवी, ता. हवेली) यांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवार पेठ येथील घरात १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या पूर्वी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव पायगुडे याचा कौटुंबिक कारणावरुन पहिला घटस्फोट झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये राजीव याने मनिषा ऊर्फ मंगल हिच्यासोबत दुसरे लग्न केले. मनिषा हिला पहिल्या पतीपासून स्मृती व रोहीत अशी दोन मुले आहेत. राजीव त्यांच्याबरोबर त्यांच्या हवेली तालुक्यातील मुळ गाव मांडवी येथे रहात होता. तो तहसीलदार कार्यालयात काम करत असल्याने त्यांच्या वडिलोपार्जित शुक्रवार पेठेतील घरी राहत असे. रात्री मांडवी येथे जात असे.
राजीव याचा २० एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी रवींद्र पायगुडे यांना फोन आला. त्याने सांगितले की, पत्नी मनिषा, मुलगी स्मृती व मुलगा रोहित यांनी कोयत्याने मारहाण केली आहे. ते खूप त्रास देतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी जीवन संपवणार. मी दोन दिवसांमध्ये तुम्हाला दिसणार नाही, असे सांगितले. रवींद्र पायगुडे यांनी त्याला खूप समजावुन सांगितले. तु आईकडे काही दिवस रहा, असे सांगितले.

त्यानुसार तो काही दिवस बिबवेवाडी येथे आई व बहिणीसोबत राहत होते  . त्यानंतर १५ जून रोजी शुक्रवार पेठेतील घरी राजीव याने विष पिऊन स्वत:ला संपविले. त्यांनी मरणापूर्वी खडक पोलिसांच्या नावाने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्याने म्हटले होते की, त्याची पत्नी मंगल, मुलगी स्मृती व मुलगा रोहित यांना फक्त पैसे पाहिजेत, माणुसकी नको. २० एप्रिल रोजी त्याला मारहाण केल्यानंतर तो मांडवी येथील घरी गेला नव्हता. त्यांना लहानाचे मोठे केले आहे, तरी त्यांनी त्या उपकाराची जाण ठेवली नाही. त्यामुळे मला जगायचे नाही. मंगल हिने माझ्या आईवडिलांचे नाव खराब केले आहे. मनिषा ही जादुटोणा करीत आहे. त्यामुळे आता जगायचे नाही. मंगल, स्मृती, रोहित यांच्या मानसिक त्रासाला व जाचाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. खडक पोलिसांनी तिघांना मांडवी येथील घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे तपास करीत आहेत.

You may have missed