Pune Crime News | एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या तरुणाने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या; जवळपास ४ लाखांचे झाले होते कर्ज

Pune Crime News | A young MPSC aspirant committed suicide by hanging due to being in debt; the debt was nearly 4 lakh rupees.

पुणे : Pune Crime News | भाड्याने खोली घेऊन एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या तरुणाची कर्ज बाजारीपणाला कंटाळून घरातील बेडशिटने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

प्रथमेश देशमुख (वय २८, रा. नंदन सोसायटी, शनिवार पेठ, मुळ रा. परांडा, जि. धाराशिव) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर जवळपास ४ लाखांचे कर्ज होते. त्याने ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांची दोन पानी यादी केली होती. त्यात त्याने कोणाकडून किती पैसे घेतले, त्यांची नावे व त्यापुढे रक्कम नमूद केली आहे. ज्यांचे पैसे परत दिले़ त्यांच्या नावापुढे बरोबरची टिक केली आहे.

प्रथमेश देशमुख हा गेले ४ वर्षे पुण्यात भाड्याने खोली घेऊन राहत आहे. त्याचे बी एस्सीपर्यंत शिक्षण झाले आहे. परांडा येथे त्यांची अडीच एकर शेती आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून त्याच्या बहिणी विवाहित आहे. एमपीएससीच्या परिक्षेत त्याला थोड्याशा गुणांनी अपयशाचा सामना करावा लागला आहे. तो काहीसा अबोल आहे. कोणाबरोबर आपल्या मनातील बाबी तो शेअर करत नव्हता. त्यामुळे त्याच्या मनात काय चालले आहे. हे त्याच्याबरोबरच्या मित्रांना समजू शकले नाही. बुधवारी सकाळी त्याने घरातील बेडशीटने गळफास घेतल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व माहिती घेतली.

प्रथमेश देशमुख हा कर्जाचा बोजा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आलेल्या  अपयशाच्या  तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव नातेवाईकांकडे सोपविण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले.

एमपीएससी परीक्षेत अपयश, वाढता कर्जाचा बोजा आणि पेपरफुटीमुळे होत असलेला विलंब या सर्व बाबींचा परिणाम त्याच्यावर होऊन त्याने हा दुर्दैवी  मार्ग अवलंबिलेला दिसून आला आहे.

You may have missed