Pune Crime News | गुंतवणुक केल्यास 50 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून 27 लाख रुपयांची फसवणूक करुन पतीपत्नी झाले फरार
पुणे : Pune Crime News | व्यवसायात गुंतवणूक केल्यास नफ्यामध्ये ५० टक्के वाटा देण्याचे आमिष दाखवून काही जणांकडून २७ लाख रुपये घेऊन दोघे पतीपत्नी पसार झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत आदित्य अर्जुन भागवत (वय ३२, रा. नॅशनल पार्क, माणिकबाग) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन नितिन बाफना (वय ४०), दामिनी नितिन बाफना Damini Nitin Bafna (वय ३५, दोघे रा. पद्मपुंज सोसायटी, बिबवेवाडी, मुळ रा. बंगलोर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे इन्फिनिटी कार डेकोर नावाचे कार पार्टस होलसेल व रिटेल विक्रीचे दुकान आहे. नितीन व दामिनी बाफना हे २०२१ मध्ये बंगळुरुहून पुण्यात आले. मामाच्या इमारतीत ते राहत होते़. त्यावरुन मामाची ओळख झाली होती. मामाने बाफना यांना व्यवसाय उभा करण्यास आवश्यक ती मदत करायला सांगितले. कार डेकोर व कार अॅक्सेसरीज या क्षेत्रात भागवत यांना अनुभव असल्याने त्यांनी आवश्यक ती मदत केली. ७ ऑगस्ट २०२५ मध्ये बाफना याने त्याचा काही माल ट्रान्सपोर्टमध्ये अडकला आहे. तो सोडवण्यासाठी पैशांची गरज आहे. माल सोडवून विकल्यानंतर मिळणार्या नफ्यातून ५० टक्के हिस्सा तुम्हाला दिला जाईल, असे आमिष दाखवले. तसेच भागवत यांच्या इतर मित्र परिवारानेही या व्यवहारात गुंतवणूक केल्यास त्यांना नफ्यामध्ये ५० टक्के हिस्सा देण्याचे आमिष बाफना यांनी दिले.
त्या सर्वांनी मिळून वेळोवेळी २७ लाख रुपये बाफना याला दिले. तसेच बाफना याने त्याचा मित्र श्रीकांत चौधरी हा पैशांसाठी तगादा लावत असल्याचे व चीनमधून येणारा माल विकून ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्याच्याकडे नफ्याबाबत विचारणा केल्यावर त्याने वेळोवेळी काहीना काही कारणे सांगून टाळाटाळ केली. जानेवारी २०२६ मध्ये भागवत यांनी फोन केल्यावर बाफना याने ‘‘तुम्हारे पैसे अब डुब गये है़ तुम्हे अब ये पैसे भुल जाओ, तुमको एक रुपया भी नही मिलने वाला है, मुझे कॉल मत करना, मै अब बंगलोर आया हू, तुम जो उखाड सकते हो, उखाड लो, मै पैसे नही देनेवाला,’’ असे हिंदीतून तो बोलला. दोघा बाफना पतीपत्नीने पूर्वनियोजित कट करुन त्यांना खोटे आमिष दाखवुन त्यांचा विश्वासघात केला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.
