Pune Crime News | धनादेशाद्वारे बिल देऊन सोन्याची बिस्किटे घेऊन जाऊन चंदुकाका सराफ यांना घातला पावणे पंधरा लाखांचा गंडा; पोलीस तपासात समोर आला नवा ट्विस्ट

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | लग्नासाठी दागिने हवे असल्याचे सांगून ९६ लाखांचे दागिने खरेदी केले.  ते घेऊन न जाता केवळ धनादेश दिला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची सोन्याची ३ बिस्किटे घेऊन गेले. त्यांनी दिलेले दोन्ही धनादेश खात्यात शिल्लक नसल्याने बाऊन्स झाले. चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांची दोघा भामट्यांनी फसवणूक केल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चंदुकाका सराफ यांच्या उपव्यवस्थापिका रुपाली श्रीराम खाडे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिद्धार्थ झेंडे पाटील Siddharth Zende Patil (रा. बारामती) आणि पुजा विनायक तनपुरे Pooja Vinayak Tanpure यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना चंदुकाका सराफ अँड सन्स या जुना मुंढवा रोडवरील दुकानात ३ व ४ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडली.

पुजा तनपुरे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असताना आणखी एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. सिद्धार्थ झेंडे पाटील याने  पुजा तनपुरे हिला माझी मोठी कंपनी आहे असे सांगून तुझ्याशी लग्न करतो, असे बोलून तिची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदुकाका सराफ यांच्या चंदननगर येथील दुकानात सिद्धार्थ झेंडे व पुजा विनायक तनपुरे असे नाव सांगणारे दोघे जण ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासात वाजता आले. त्यांनी आम्ही दोघे जण लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. मी बारामतीचा असून तुमच्या मालकांना मी ओळखतो. तुमच्या संभाजीनगर, बारामती शाखेतून यापूर्वी कंपनीतील कर्मचारी यांना देण्यासाठी सोन्याची ९९९ बिस्किटे नेहमी खरेदी करत असतो.

तुमच्याकडे एवढा स्टॉक नसतो, त्यामुळे मी मलाबार ज्वेलर्सकडून घेत असतो, असे सांगून त्यांना संभाजीनगर येथील शाखेमध्ये  खरेदी करण्यासाठी गेलेले मोबाईलवरील फोटो दाखविले. आपली प्रगती बिल्ड कॉन नावाची पवनचक्कीची कंपनी असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी धनादेश स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यांनी सोने, हिरे व चांदीचे दागिने पसंत केले. एकूण ९६ लाख ७७ हजार ८०० रुपयांचे बील झाले. त्याचा पुजा तनपुरे हिने धनादेश दिला व खरेदी केलेले दागिने लगेच न नेता लग्नाचे आधी घेऊन जाईल, असे सांगितले. दोघेही दुकानामधून रात्री उशिरा निघून गेले.

४ ऑगस्ट रोजी सिद्धार्थ झेंडे पाटील याने सकाळी फोन करुन आपल्याला १०० ग्रॅमची सोन्याची ६ बिस्किटे  व तेही दुपारी १२ पूर्वी हवी असल्याचे सांगितले. दुपारी १ वाजता पुजा तनपुरे या सोन्याची बिस्किटे घेण्यासाठी आल्या.

कामात असल्याने सिद्धार्थ झेंडे हा काही आला नाही. तिने १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांचा धनादेश दिला व सोन्याची ३ बिस्किटे घेऊन गेली. त्याचवेळी दुपारी पावणेतीन वाजता त्यांचा मॅनेजर ओंकार तिवारी यांनी फोन करुन फिर्यादी यांना सांगितले की पुजा तनपुरे हिने दिलेले दोन्ही धनादेश खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाले आहेत. त्यांनी सिद्धार्थ झेंडे याला विचारल्यावर त्याने आमचे बँक डिटेल्स घेऊन हे पैसे आर टी जी एस द्वारे पाठवितो, असे सांगितले. त्यांच्याकडून पैसे न आल्याने त्यांनी पुजा तनपुरे हिला फोन करुन विचारणा केल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

You may have missed