Pune Crime News | पत्नीला प्रियकराबरोबर रेड हँड पकडल्यावर पतीला मारहाण करुन त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने चोरुन नेणार्या प्रियकर, त्याच्या मामाला केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | रिक्षाचालकाने मोटारसायकलवरुन जाणार्या पत्नीला प्रियकराबरोबर रेड हँड पकडल्यावर प्रियकर व त्याच्या मामाने बेदम मारहाण करुन खिशातील पैसे जबरदस्तीने चोरुन नेले होते. गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने प्रियकर आणि त्याच्या मामाला अटक केली.
राजू तिमय्या राव ऊर्फ धोत्रे Raju Timayya Rao alias Dhotre (वय ५१) आणि गणेश अशोक रेड्डी Ganesh Ashok Reddy (वय ३६, दोघे रा. भाऊ पाटील रोड, आदर्शनगर, बोपोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका रिक्षाचालकाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते १० जून २०२६ रोजी रात्री १० वाजता लोहगाव एअरपोर्ट येथे प्रवाशाला सोडल्यानंतर ते खडकीकडे जाण्यासाठी भाडे मिळते का याची वाट पहात होते. त्यावेळी त्यांची पत्नी तिचा प्रियकर गणेश रेड्डी याच्याबरोबर बुलेटवरुन एअरपोर्ट रोडवरुन वाघोली रस्त्याकडे जाताना दिसले. त्यांनी पाठलाग करुन फॉरेस्ट पार्क रोडवर रिक्षा आडवी घालून बुलेट अडवली. त्यांनी पत्नीला विचारले की तु इकडे काय करते. याच्या सोबत का फिरतेस, असे विचारले. त्यावर तिने सांगितले की, माझे या ठिकाणी हर्बलचे ऑफिस आहे.
गणेश रेड्डी मला सोडवण्यासाठी आला आहे. ती बोलत असताना तिचा प्रियकर गणेश रेड्डी फिर्यादीच्या जवळ आला व शिवीगाळ करुन “तू माझा पाठलाग करत आहे का,” असे म्हणून मारहाण करु लागला. फिर्यादी यांच्या डोक्यात रस्त्यावरील काठीने मारहाण केली. त्यांच्या पत्नीनेही हाताने मारहाण केली. त्यावेळी गणेश रेड्डी याचा मामा राजु धोत्रे तेथे येऊन त्यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. यावेळी गणेश रेड्डी याने फिर्यादी यांच्या पँटच्या खिशातील १८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन चोरुन नेले. ससून रुग्णालयात उपचार घेऊन ते घरी गेले. तेव्हापासून त्यांची पत्नी गणेश रेड्डीबरोबर राहत आहे. त्यांनी समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती फिर्यादीच्या घरी परत न आल्याने शेवटी ८ ऑगस्ट २०२६ रोजी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक खडकी परिसरात २५ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत होते. ते बोपोडी औंध रोडवरील आंबेडकर चौकात आले. त्यावेळी पोलीस अंमलदार अनिकेत भोसले व जहांगीर पठाण यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,लोहगाव पोलीस ठाण्याकडील पाहिजे असलेले आरोपी राजू धोत्रे व गणेश रेड्डी हे औंध येथील भक्ती प्लाझा अपार्टमेंट येथे थांबलेले आहे. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता ते दोघे उभे असलेले दिसले. दोघांना पकडून पुढील कारवाईसाठी लोहगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, दिग्विजय चौगले, पोलीस अंमलदार हरीष मोरे, एकनाथ जोशी, अनिकेत भोसले, जहांगीर पठाण, दत्तात्रय गेंगजे, विठ्ठल वाव्हळ, किशोर दुशिंग, नितीन साबळे, तुषार खराडे, सुभाष आव्हाड, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, वैभव रणपिसे, शरद झांजरे यांनी केले आहे.
