Pune Crime News | पुणे : IPL सट्टेबाजी प्रकरणात तरुण अटकेत; बनावट आधार कार्डवर सिम घेऊन चालवत होता ऑनलाइन बेटिंग रॅकेट
पुणे : Pune Crime News | आयपीएल टी-20 स्पर्धेतील अंतिम सामन्यावर ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून सट्टा खेळविणाऱ्या एका तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपीने बनावट आधार कार्ड तयार करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हिमांशू ओमप्रकाश सोलंकी Himanshu Omprakash Solanki (वय 26, रा. सुखसागरनगर, कात्रज) असे आहे. न्यायालयाने त्याला 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अंतिम पोलिस अंमलदार उदय राक्षे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी रात्री जंगली महाराज रस्त्यावरील एका लॉजमध्ये आरोपी आयपीएलच्या अंतिम सामन्यावर मोबाईलद्वारे ऑनलाइन सट्टा स्वीकारत असल्याचे आढळून आले. सट्टेबाजीसाठी त्याने एका व्यक्तीच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार केले होते. तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवून त्याचा वापर बेकायदा क्रिकेट बेटिंगसाठी केला जात होता.
ऑनलाइन बेटिंगचे मोठे रॅकेट उघडकीस
प्राथमिक तपासात आरोपी विविध बेटिंग अॅपच्या माध्यमातून यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवून ऑनलाइन सट्टा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे आयडी आणि पासवर्ड पुरविणारे मोबाईल क्रमांक ठाणे आणि उल्हासनगर परिसरातील असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांच्या मते, आरोपी आणि त्याचे साथीदार मिळून ऑनलाइन बेटिंगचे मोठे रॅकेट चालवत असण्याची शक्यता असून आयपीएल स्पर्धेतील अनेक सामन्यांवर मोठ्या प्रमाणात जुगार खेळला गेला असावा. आरोपीचे बँक व्यवहार, साथीदारांची भूमिका, बनावट आधार कार्ड कोठे तयार करण्यात आले आणि सिम कार्ड कुठून मिळविण्यात आले याचा सखोल तपास सुरू आहे.
खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आगामी काळात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
