Pune Crime News | पुण्यात हवाई दलातील तोतया जवानाला अटक; बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त
पुणे : Pune Crime News | भारतीय हवाई दलातील जवान असल्याचे भासवत गणवेश परिधान करून वावरणाऱ्या एका तरुणाला लोहगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून हवाई दलातील जवानाचे कथित बनावट ओळखपत्र तसेच गणवेश जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शुभम विलास अंबुरे Shubham Vilas Ambure (वय २६, सध्या रा. स्वप्ननगरी सोसायटी, शिक्रापूर रस्ता, ता. शिरूर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय ४८) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबुरे याने लोहगावमधील गुरुद्वारा रस्त्यावरील एका टेलरिंग दुकानातून हवाई दलातील जवानासारखा गणवेश शिवून घेतला होता. त्याने हवाई दलातील जवानाचे बनावट ओळखपत्रही तयार करून घेतल्याचा आरोप आहे.
हा गणवेश परिधान करून आणि कथित बनावट ओळखपत्र बाळगून तो परिसरात वावरत असल्याची माहिती हवाई दलातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी सापळा रचून त्याला पकडले आणि पुढील कारवाईसाठी लोहगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
लोहगाव पोलिसांनी अंबुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याने हवाई दलाचा गणवेश नेमका कोणत्या उद्देशाने परिधान केला होता, बनावट ओळखपत्र कसे आणि कुठे तयार करण्यात आले, तसेच त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
