Pune Rain Updates | पुणेकरांना दिलासा! मंगळवारपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
पुणे : Pune Rain Updates | गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता मंगळवारपासून (२३ जून) शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे राज्यातील मॉन्सूनची वाटचाल सध्या मंदावली असून, २३ जूननंतर तो पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. अरबी समुद्रावरील मॉन्सूनचे प्रवाह कमकुवत झाल्याने तसेच वायव्येकडून येणारे उष्ण व कोरडे वारे आणि कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव यामुळे पावसाचा वेग कमी झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी शहरात कडक ऊन पडल्याने उकाड्यात वाढ झाली होती. शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. शनिवारी (२० जून) कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
सध्या आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असले तरी दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून तापमानात किंचित घट होऊन मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
