Pune Crime News | पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने केले जेरबंद; 100 हून अधिक गुन्हे असलेल्या अजयसिंग दुधानीकडून पिस्टल, 6 काडतुसे जप्त
पुणे : Pune Crime News | पुणे – सोलापूर महामार्गावरी पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारी असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पाठलाग करुन गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने तिघांना जेरबंद केले. त्यात १०० हून अधिक गुन्हे असलेल्या अजयसिंग दुधानी याच्याकडून १ गावठी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय २६, रा. भापकर वस्ती, मांजरी, हडपसर), रामजीतसिंग रणजीतसिंग टाक (वय २७, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), अभयसिंग सिंकदसिंग जुनी (वय २१, रा. सुखकर्ता कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रोशन घाडगे (रा. मांजरी खुर्द), शंकरसिंग टाक आणि समीर ऊर्फ कमांडो (दोघे रा. तुळजा भवानी वसाहत, हडपसर) हे तिघे पळून गेले आहेत.
अजयसिंग दुधानी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर तब्बल ६० घरफोडीचे गुन्हे दाखल असून एकूण ९१ गुन्हे महाराष्ट्रात तर १९ गुन्हे अन्य राज्यात दाखल आहेत. रामजितसिंग टाक याच्यावर ९ गुन्हे दाखल असून अभयसिंग जुनी याच्यावर ६ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी सांगितले.
याबाबत पोलीस हवालदार अमित दत्तात्रये कांबळे (वय ४०) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, समीर पांडुळे, बाळासाहेब सकटे, प्रमोद टिळेकर, पोलीस अंमलदार शेखर काटे, गणेश माने हे १० जून रोजी रात्री अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी अमित कांबळे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, अजयसिंग दुधानी व त्याचे साथीदार हे होंन्डा सीव्हीआर कारसह भापकर मळा येथे थांबलेले आहेत. या माहितीनुसार पोलिसांचे पथक भापकर मळा येथे आले. त्यावेळी एक होन्डा कार जाताना त्यांना दिसली. त्यांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता होन्डा कारचालक वेगाने जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. रेल्वे पुलाजवळ पोलिसांनी वेगाने गाडी पुढे नेऊन त्यांच्या कारला आडवी घालून थांबवण्यास भाग पाडले. यावेळी कारमधील तिघे जण पळून गेले. इतर तिघांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. अजयसिंग दुधानी, रामजित सिंग टाक आणि अभयसिंग जुनी यांना ताब्यात घेतले. इतक्या रात्री कोठे जात होता, असे विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांनी अजयसिंग दुधानी याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या पँटच्या खिशात ४ जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी कारची झडती घेतली. त्यात कारच्या पुढील डाव्या बाजूच्या बॉक्समध्ये गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आहे. तसेच कारमधील मधल्या सीटच्या पॅसेजमध्ये ६ घातक हत्यारे, मिरची पुड व दोरी मिळून आली.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आम्ही सर्व जण मिळून फुरसुंगी फाटा येथे सोलापूर रोडवरुन येणार्या गाड्या लुटणार होतो व रात्रीच्या वेळी उघडा असलेला पेट्रोल पंप लुटणार होतो, असे सांगितले. आरोपींकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, हत्यारे व कार असा ६ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक डिगोळे तपास करीत आहेत.
