Pune Crime News | इन्फॉरमेशन टेक्नोलॉजीच्या (IT) विद्यार्थ्यांने बनविले डुप्लिकेट अ‍ॅप ! 2025 पासून करत होता डुप्लिकेट अ‍ॅपने पीएमपीतून प्रवास, चाणाक्ष बस कंडक्टरने पकडून दिले आजवर 5 बनावट प्रवासी

Pune Crime News | IT student created a duplicate app! From 2025, he was traveling using the duplicate app through PMP, got caught by a sharp bus conductor, so far 5 fake passengers

पुणे : Pune Crime News | भेकराईनगर ते आळंदी या बसमधून प्रवास करणार्‍या एका तरुणाने रुबी हॉल बसस्थानकावर बस कंडक्टर यांना दैनंदिन पास दाखविला. त्यात काहीतरी चुकीचे असल्याने दिसल्याने त्यांनी त्याची तक्रार आगार प्रमुखाकडे केले. पीएमपीच्या आयटी विभागाने त्याची चौकशी केल्यावर त्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका महाविद्यालयात इन्फॉरमेशन टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आपल्या शिकत असलेल्या गोष्टींचा उपयोग करुन चक्क पीएमपीसारखे अ‍ॅप तयार केले. त्यावरुन त्याला जेव्हा प्रवास करायचा त्यावेळी दैनंदिन पास तयार करुन तो पीएमपी बसमधून प्रवास करत असे. २०२५ पासून तो या अ‍ॅपचा वापर करुन पीएमपीची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. इतक्या वेळा त्याने वेगवेगळ्या कंडक्टरांना फसवले. पण, पीएमपीचे कंडक्टर दत्तात्रय जायभाये यांच्या तीक्ष्ण आणि शोधक नजरेला तो चुकवू शकला नाही.

प्रथमेश लक्ष्मण बोगे Prathamesh Laxman Boge (वय २०, रा. रेड क्लीफ शाळेजवळ, चर्‍होली) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीएमपीचे सहायक डेपो मॅनेजर रामदास दुंदाजी विरनक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेकराईनगर ते आळंदी बसस्थानक या बसमध्ये कंडक्टर दत्तात्रय जायभाये यांना रुबी हॉल येथे एक डुप्लीकेट अ‍ॅप्लीकेशन वापरुन प्रथमेश बोगे नावाचा तरुण प्रवास करताना आढळून आला आहे. आळंदी येथे तुम्ही पोहचून त्याच्यावर कारवाई करा. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी बोगे याची संपूर्ण माहिती घेऊन दिघी पोलिसांनी प्रथमेश बोगे याला समज देऊन दुसर्‍या दिशी स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात बोलवले. त्याप्रमाणे तो पीएमपी मुख्यालयात आला. त्याच्या मोबाईलमधील पीएमपी अ‍ॅपची तांत्रिक तपासणी केली. पीएमपी अधिकृत मोबाईल अ‍ॅप्लीकेशनमध्ये दर दिवशी जे पासने प्रवास करतात. त्या पासचे बॅकग्राऊंडला प्रत्येक दिवशी एक कलर निश्चित करुन दिला जातो. प्रथमेश बोगे याच्या पासवर ३० ऑगस्ट रोजी पीएमपीने निश्चित केलेला कलर वेगळा होता. त्यावरुन त्याचा पास डुप्लिकेट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर तो एका नामवंत इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याला कोडींग व प्रोग्रॉमिंगचे ज्ञान असल्याने ते वापरुन त्याने हे अ‍ॅप्लीकेशन स्वत: बनवल्याचे सांगितले. ते अ‍ॅप्लिकेशन मार्च २०२५ पासून त्याच्याकडे आहे. जेव्हा प्रवासासाठी पैसे नसतात. तेव्हा ते वापरतो, असे सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीएमपीचे कंडक्टर दत्तात्रय जायभाये यांनी सांगितले की, अशा प्रकारे बनावट पास वापरुन पीएमपीची फसवणूक करणार्‍या ५ जणांना मी पकडून दिले आहे. पीएमपीने दिलेल्या पासचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्याच्याकडेला ऑल पास असे लिहलेले असते. पूर्वी एक पास चेक करत असताना तो मागे नेला की स्क्रीनवरुन दिसत नसे. त्यावरुन एका प्रवाशाला पकडून दिले होते. त्यानंतर माझ्या सुचनेवरुन पीएमपीने एक परिपत्रक काढले होते. या तरुणाकडील पासवर ते सर्व दिसत होते. पीएमपीचा पास खाली नेला की बसचे वेळापत्रक व अनेक बस धावताना दिसतात. या तरुणाचा पास रंग फिकट वाटला. बॅक गेल्यावर तो पास दिसत होता. मात्र, खाली नेल्यावर त्यावर वेळापत्रक दिसत असले तरी त्यात एकाच बसचे चित्र दिसत होते. त्यावरुन शंका आली. त्याला विचारले की हे अ‍ॅप कोठून डाऊनलोड केले. तेव्हा त्याने पीएमपीत लावल्या स्टिकरवरुन असे उत्तर दिले. त्यानंतर हा पास घेतला, त्याचे पेमेंट केल्याचे रिसिट दाखव, असे विचारले. तेव्हा वडिलांनी त्यांच्या मोबाईलवरुन पेमेंट केल्याचे सांगितले.  तरीही मला शंका आल्याने मी तक्रार केली होती. त्यानंतर एका बँक कर्मचार्‍याकडे चौकशी केली. तेव्हा असे पेमेंट करता येते, असे त्यांनी सांगितले. ते जरी खरे असले तरी मला आलेली शंका खरी ठरली. पीएमपीची होणारी फसवणूक थांबू शकेल, याचे समाधान आहे.

You may have missed