Pune Crime News | मेट्रो प्रकल्पातील व्यवसायिकाचे अपहरण करुन 50 लाखांची खंडणी मागणार्या 5 जणांना खराडी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | खडी क्रशर प्लॅन्ट दाखविण्याची बतावणी करुन मेट्रो प्रकल्पासाठी काम करणार्या व्यवसायिकाचे अपहरण करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागणार्या ५ जणांना खराडी पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली.
सागर दत्तात्रय झुरुंगे Sagar Dattatreya Zurunge (वय ३९), विजय सुरेश वाळुंज Vijay Suresh Walunj (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे Raju Vijaykumar Sahane (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे Rupesh Shivaji Gawade (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता), प्रकाश बाळासाहेब राऊत Prakash Balasaheb Raut (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
याबाबत गहुंजे येथे राहणार्या एका ४० वर्षाच्या व्यावसायिकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी येथील इराणी कॅफे येथून पेरणे फाटा दरम्यान १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे उत्तर प्रदेशातील राहणारे असून त्यांचे आनंद स्काय इन्फोटेक या नावाने व्यवसाय आहे. रेल विकास निगम लि़ च्या वतीने त्यांची कंपनी मेट्रो प्रकल्पात सिव्हिल वर्कचे काम करीत आहे. जुलै ते ऑगस्ट २०२५ दरम्यान आकुर्डी येथील रेल विकास निगमच्या कार्यालयात त्यांची सागर झुरंगे यांच्याबरोबर ओळख झाली. तो खडी स्टोन क्रशर मालाचा पुरवठा करतो. त्यांची कंपनी त्याच्याकडून ४५ दिवसांच्या क्रेडिटवर माल घेऊन नियमाप्रमाणे बिल दिले जात होते. सागर झुरुंगे याचे ५० लाखांचे बिल बाकी होते.
१३ एप्रिल रोजी सकाळी सागर झुरुंगे याने त्यांना फोन करुन सिव्हिल कंस्ट्रक्शनसंबंधी बोलणी करायची आहे, केव्हा भेटता येईल, असे विचारले. त्यानंतर १४ एप्रिल रोजी भेटायचे ठरले. १४ एप्रिल रोजी ते आपल्या फॉरच्युनर गाडीसह इराणी कॅफेमध्ये भेटले. त्यांच्याबरोबर त्यांचा चालक संतोष विश्वकर्मा हाही होता. झुरुंगे याने क्रशर प्लॅन्ट बघुन येऊयात असे सांगितले. त्यांनी बळजबरीने त्यांना स्वत:च्या फॉरच्युनर गाडीतून खराडी जकात नाका येथील क्रशर प्लॅन्टला नेले. तेथे झुरुंगे यांच्याबरोबर एका कंटेनरमध्ये ते बसले. त्यांच्याबरोबर झुरुंगे यांच्यासह तिघे जण येऊन बसले. तेव्हा सागर झुरुंगे याने त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली व हे पैसे मला आजचे आज पाहिजे, असे बोलला. त्यांच्याकडील दोन्ही मोबाईल फोन बंद करुन ठेवले. झुरुंगे याचे आणखी ३ जण तेथे आले. ते सर्व जण फिर्यादी यांना सागर झुरुंगे याचे पैसे देऊन टाक नाही तर, तुला बघुन घेऊ असे बोलून दमदाटी करु लागले. जोपर्यंत त्याचे पैसे देत नाहीत, तोपर्यंत तू माझे सोबत राहशील, असे सागर बोलून त्यांना कंटेनरमधून बाहेर काढून त्यांना मारहाण केली. त्यांना फॉरच्युनर गाडीमध्ये बसविले. त्यांना पुणे अहिल्यानगर रोडने रांजणगाव दिशेने घेऊन चालले होते. झुरुंगे याने त्याची गाडी नविन बिल्डिंगचे कंस्ट्रॅक्शन साईटवर उभी केली. तेव्हा दुसरी फोर्ड एंडेवर गाडी आली. त्या गाडीमध्ये त्यांनी फिर्यादी यांना बसविले़ त्यांना घेऊन ते कोठेतरी चालले होते.
दरम्यान, सागर झुरुंगे याने फिर्यादी याच्या वडिलांना फोन करुन माझे ५० लाख रुपये देत नाही, तो पर्यंत तुमच्या मुलाला सोडणार नाही, असे सांगितले. फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यांच्या कारचालकाकडे चौकशी केल्यावर त्यांना पांढर्या रंगाच्या फॉरच्युनर कारमधून घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले. फिर्यादी यांच्या वडिलांनी
सागर झुरुंगे व त्याचे साथीदार फिर्यादी यांना घेऊन गेल्याचे पोलिसांना सांगितले़
खराडी पोलिसांनी तातडीने हालचाल करुन या फॉरच्युनर गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अहिल्यानगर रोडवर विजय स्तंभासमोर पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यात फिर्यादी यांना घेऊन जाणारी गाडी सापडली. फिर्यादी यांनी पोलिसांना अपहरणाची बाब सांगितली. पोलिसांनी गाडीतील ५ जणांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी याची माहिती दिली़ सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.
