Pune Crime News | अधिक मासात सोन्याची अंगठी न दिल्याने विवाहितेचा छळ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

Pune Crime News | Married woman tortured for not giving her a gold ring for more than a month; Husband arrested for abetting suicide

पुणे : Pune Crime News | अधिक मासानिमित्त जेवणासाठी बोलावूनही सोन्याची अंगठी न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी विवाहितेच्या पतीला अटक केली आहे.

तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५, रा. विशाललीला सोसायटी, तुकारामनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. गोरख संभाजी सोनवणे Gorakh Sambhaji Sonawane (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी सासरे संभाजी सोनवणे (वय ६२) आणि सासू अलका सोनवणे (वय ५५) यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२१ ते ३ जून २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याबाबत अहिल्यानगर येथील तेजस्विनी यांच्या वडिलांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी यांचा विवाह जून २०२१ मध्ये गोरख सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर गोरख सोनवणे आणि त्याच्या आई-वडिलांकडून माहेरहून विविध कारणांनी पैशांची मागणी केली जात होती. कार आणि घर खरेदीसाठीही सतत पैशांची मागणी करत तेजस्विनी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे.

यंदा अधिक मास असल्याने तेजस्विनी यांच्या आई-वडिलांनी जावई गोरख सोनवणे याला जेवणासाठी घरी बोलावले होते. त्यावेळी अधिक मासाचे वाण म्हणून सोन्याची अंगठी देण्याची मागणी गोरखने केली. मात्र, तेजस्विनी यांच्या आई-वडिलांनी पोशाख देऊन त्याचा मान ठेवला होता. सोन्याची अंगठी न दिल्याने घरी परतल्यानंतर तेजस्विनी यांना अधिक त्रास दिला गेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या छळाला कंटाळून तेजस्विनी यांनी ३ जून २०२६ रोजी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी पती गोरख सोनवणे याला अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद धुर्वे करीत आहेत.

You may have missed