Pune Crime News | जिरे मसाला माल घेऊन कार्यालय बंद करुन अनेकांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या ओशियन ट्रेडर्सवर स्वारगेट पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  जिरे मसालाची ऑर्डर देऊन सुरुवातीला त्याचे काही पैसे देऊन नंतर दुसरी मोठी ऑर्डर दिल्यावर सर्व पैसे देण्याचे आश्वासन देऊन दुकान बंद करुन व्यापाऱ्यांची  कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ओशियन ट्रेडर्सच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत प्रविण पांडुरंग मेतकुटे (वय ५०, रा. गणेशनगर, धायरी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फरहान अख्तर खान (Farhan Akhtar Khan), इरफान खान आणि चाचा (रा. मंत्री अपार्टमेंट, सॅलसबरी पार्क) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान सॅलसबरी पार्क येथील ओशियन ट्रेडर्स येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण मेतकुटे यांचा आयुर्वेदिक कच्चा माल व मसाले पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवसाय मेडीवेल रेमेडीज या नावाने धायरीत आहे. ते कच्चा माल मुंबई, वाशी, गुजरातमधील ऊंजा, मध्यप्रदेशातील निमच इत्यादी ठिकाणाहून मागवितात. पुढे ग्राहक व्यापाऱ्यांना विक्री करतात़ फरहान अख्तर व त्याचा भाऊ इरफान खान यांनी त्यांना ५ टन जिरे खरेदीची ऑर्डर आगाऊ पैसे न देता दिली. बाजारात स्पर्धा असल्याने त्यांनी आगाऊ पैसे न घेता त्यांना ५ टन जिरे पुरविले. त्याचे १० लाख ९४ हजार रुपयांचे बिल दिले. फरहान अख्तर यांनी उर्वरीत २ लाख ५० हजार रुपये व १० टन जिरे मालाचे पैसे एकदम देतो, असे सांगितले. त्यांनी साडेतीन टन जिरे माल पुरविला. त्याचे १० लाख ३६ हजार २०० रुपये व मागील २ लाख ५० हजार रुपये असे एकूण १२ लाख ८६ हजार रुपयांची मागणी केली. फरहान याने एका पार्टीचा चेक आला आहे.

तो १७ एप्रिल २०२६ रोजी क्लिअर होईल, त्यानंतर तुमचे पैसे देतो, असे सांगितले. पण, त्यांचा फोन बंद लागला. कार्यालयात जाऊन पाहिले तर त्यांचे कार्यालय बंद होते. फरहान खान हा आजारी असून मुंबईत ब्रीच कॅन्डीमध्ये उपचार घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही़ फिर्यादी यांचे १२ लाख ८६ हजार रुपये तसेच लझ फॉर्मस अँड ट्रेडर्सचे अब्दुल मथीन, गजानंद कंपनी, सियागंज, इंदौर यांचे सुमित सचदेवा, असोपा सन्स, कोंढवा यांचे दीपक, ए एम कामदोद अँड सन्स, हवेरी कर्नाटकचे अमीर हमजा कागदोद, गौराई अ‍ॅग्रोटेक, सांगलीचे सागर शेगणे, सत्ययानी इंडिया प्रा. लि. अहमदाबाद चे धवल, पाटलीपुत्र सुपर फुडस प्रा. लि. पाटणाचे आय खान, सचिन इंपेक्स ट्रेडिंग दिल्लीचे सचिन दुआ यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन ते कार्यालय बंद करुन पळून गेले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट तपास करीत आहेत.

You may have missed