Pune Crime News | विषारी दारुच्या थैमानानंतर पोलिसांची एकाच दिवसात 8 ठिकाणी कारवाई; हडपसर परिसरात 4 ठिकाणी धाडी

Crime

पुणे : Pune Crime News | पुणे शहर व पिंपरीमध्ये विषारी दारुने १९ जणांचा बळी घेतल्यानंतर शहर पोलीस खडबडून जागे झाले. त्यांनी दिवसभरात विविध ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात ८ ठिकाणी गावठी दारु विकणार्‍या महिला व पुरुषांना पकडण्यात आले. हडपसर परिसरात ४ ठिकाणी कारवाई करण्यात आली.

हडपसर येथील पांढरे मळा परिसरातील चौघांचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी आकाश दीपक जाधव (वय ३०, रा. पांढरे मळा, हडपसर) या दारु विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. त्याने साथीदाराच्या मदतीन दारुची निर्मिती करुन त्यामध्ये विषारी द्रव्य मिसळुन, त्याची वाहतूक करुन ही विषारी दारु जाणीवपूर्वक लोकांना विकून त्यांचा मृत्यु घडवून आणला आहे.

हडपसरमधील गाडीतळ येथील वेताळबाबा वसाहत गणपती मंदिर जवळील पडक्या शेडमध्ये हातभट्टीची दारु विक्री केली जात होती. हडपसर पोलिसांनी २९ मे रोजी रात्री ८ वाजता तेथे धाड टाकून हसमुखसिंग मंगलसिंग जुनी (वय ३६, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) याला अटक केली. त्याच्या ताब्यातील २ हजार ५०० रुपयांची २५ लीटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली.

साडेसतरा नळी येथील दांगट वस्तीमधील गल्लीत दारु विक्री करणार्‍या महिलेला हडपसर पोलिसांनी पकडले. मनिषा मारुती चक्के (वय ५५, रा़ दांगट वस्ती, साडेसतरा नळी) हिच्याकडून ३ हजार ५०० रुपयांची ३० लीटर तयार हातभट्टी दारुचे ३ प्लॅस्टिक कॅन्ड जप्त करण्यात आले.

हडपसरमधील शांतीनगर वसाहत शेजारील उन्नतीनगर कॅनॉलजवळील पत्र्याच्या रुममध्ये हडपसर पोलिसांनी २९ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता धाड टाकली. रेखा सुरेश साळुंखे (वय ५५, रा. धवल उन्नती बिल्डिंगसमोर) हिच्याकडून २ हजार ४०० रुपयांचे हातभट्टीचे १२० फुगे, त्यात प्रत्येकी २०० मिलीलीटर दारु अशी २४ लीटर दारु जप्त केली.

बिबवेवाडी पोलिसांनी बिबवेवाडी येथील नागझरी ओढ्यालगत हातभट्टीची दारु विक्री करणार्‍या नागेश तानाजी क्षीरसागर (वय ३५, रा. ओमनगर, बिबवेवाडी) याला पकडले. तो ओळखीच्या लोकांना चोरुन हातभट्टीची दारु विकत होता. त्याच्याकडून ७ हजार २० रुपयांची गावठी दारु जप्त केली.

कोंढवा पोलिसांनी निवृत्ती स्मशानभूमीजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता कारवाई केली. अभिजित भिमराव गायकवाड (वय ४३, रा. भिमनगर, कोंढवा) याला भेसळयुक्त गावठी हातभट्टीची दारु, देशी दारु टँगो पंचच्या बाटल्यांची विक्री करताना पकडले.

वानवडी पोलिसांनी हडपसर येथील गोसावी वस्तीमधील आसावरी माता मंदिराचे पाठीमागे दारु विक्री करणार्‍या दोघांना पकडले. अर्जुन गणपती हंगारगे (वय २९),  महादेव व्यंकट औरादे (वय ३१, दोघे रा. गोसावी वस्ती, हडपसर) यांना गावठी दारु विकताना ताब्यात घेतले आहे.

बनावट ताडी विकणार्‍या तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोरमधील गारुडी वस्ती येथे शुक्रवारी सांयकाळी सव्वा पाच वाजता ही कारवाई करण्यात आली. सिद्धांत सुरेश भाले (वय २२) आणि मुक्ताबाई सुरेश भाले (वय ५१, दोघे रा. गारुडी वस्ती, लोणी काळभोर) यांनी रमेश याच्याकडून आरोग्यास अपायकारक ठरेल, अशी तयार ताडी व ताडी तयार करण्याकरीता पिवळसर पांढरगट रंगाचा स्फटीक पदार्थ लोकांना विक्री करताना मिळून आले.

You may have missed