Pune Crime News । चौपट रक्कम करुन देतो, असे सांगून बिल्डरला घातला गंडा; बाणेर पोलिसांनी तिघांविरुद्ध दाखल केला गुन्हा
पुणे : Pune Crime News । मंत्राच्या सहाय्याने दिलेली रक्कम चौपट करुन देण्याच्या भुलथापेला एक बिल्डर बळी पडला. तिघांनी त्याला ६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
औंध येथील एका २९ वर्षाच्या बांधकाम व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमोल शंकर पाटील (वय ४५, रा. विमाननगर), शिवाजी लोणकर (वय ४५, रा. वडगाव शेरी), देवराव बनसोडे (वय ४८, रा. नवी सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर येथील मंत्रा सोसायटीतील फ्लॅटमध्ये १६ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. त्यांनी फिर्यादी यांना आपण मंत्रांच्या सहाय्याने दिलेल्या रक्कमेच्या ४ पट रक्कम करुन देतो, असे सांगितले. सुरुवातीला त्यांनी हातचलाखी करुन काही नोटा चौपट करुन दाखविल्या. त्यामुळे त्यांचा त्यावर विश्वास बसला. फिर्यादी यांनी बाणेर येथील मंत्रा सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये बोलवले होते. तिघे तेथे गेले. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे ६ लाख ५ हजार ९९९ रुपये दिले.
या तिघांनी त्यांच्यासमोर त्यांच्याकडील लिक्विड नोटांवर टाकले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आणण्यास सांगत होते. फिर्यादी हे ते आणण्यासाठी आतल्या खोलीत गेल्यावर हे तिघे हातचलाखी करत असत. शेवटी त्यांनी एक पुडके फिर्यादी यांच्या हातात दिले. त्यात सर्व पैसे असल्याचे सांगितले आणि ते निघून गेले. काही वेळाने फिर्यादी यांनी ते पुडके उघडून पाहिल्यावर त्यात सर्व कोरी कागदे आढळून आली. आपल्याला फसवले असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आरोपींना फोन करुन पैसे परत मागितले. तेव्हा त्यांनी पैसे देतो, असे सांगून टाळाटाळ केली. पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर आता त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करीत आहेत.
