Pune Crime News | घराखाली पार्क केलेला टेम्पो चोरीला गेल्याचे मालकाला नव्हते माहिती, टेम्पो चोरणार्‍या दोघा सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने पकडले  

Pune Crime News | The owner was not aware that the tempo parked under the house was stolen, two criminals who stole the tempo were caught by the Crime Branch Unit 6 team

पुणे : Pune Crime News | निगडीतील त्रिवेणीनगर येथून पार्क केलेला टेम्पो कात्रीच्या सहाय्याने चालू करुन दोघा सराईत गुन्हेगारांनी तो चोरुन नेला. सासवडकडे विकण्यासाठी घेऊन जात असताना फुरसुंगी येथे ते थांबले असताना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने त्यांना पकडले. गाडी नंबरवरुन मालकाचे नाव, फोन नंबर मिळाला. पोलिसांनी मालकाला फोन लावला. “कर्नाटक पासिंगचा छोटा हत्ती टेम्पो तुमचा आहे का,” अशी विचारणा केली. तेव्हा मालकाने “हो माझाच आहे, घराच्या खाली पार्क केला आहे,” असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्याला हा टेम्पो गुन्हेगारांनी चोरुन नेला होता. आम्ही फुरसुंगी येथे पकडल्याचे सांगितले. टेम्पो मालकाने खाली जाऊन पाहिले तर टेम्पो जागेवर नव्हता. त्यानंतर त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कन्हैयासिंग कालुसिंग टाक (वय ३३) आणि राजेशसिंग नानकसिंग दुधानी (वय ४८, दोघे रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे पकडलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर यापूर्वी वाहनचोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे सहकारी फुरसुंगी परिसरात ४ मे रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर व नानासाहेब मोरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फुरसुंगी पॉवर हाऊस येथे दोघे जण छोटा हत्ती टेम्पो घेऊन थांबले आहेत. तो टेम्पो बहुतेक चोरीचा आहे. बातमीनुसार पोलिसांनी शोध घेतल्यावर पॉवर हाऊस पुलाखालील रस्त्यावर टेम्पोजवळ दोघे जण थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी त्रिवेणीनगर येथून कात्रीच्या साह्याने टेम्पो चालू करुन चोरला असून सासवडला घेऊन जात होतो, अशी कबुली दिली. दोघांना चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मिसाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, बाळासाहेब सकटे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार, पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे व अनिल जामगे यांनी केली आहे.

You may have missed