Pune Crime News | पुणे : मैत्रिणीशी बोलल्याच्या कारणावरुन स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरुणाचे अपहरण, पोलिसांनी दोघांना गजाआड करुन 53 मिनिटात केली सुटका
पुणे : Pune Crime News | मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरुणाचे अपहरण करुन मारहाण केली. पोलिसांना मध्यरात्री साडेबारा वाजता याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करुन अवघ्या ५३ मिनिटात अपहरणकर्त्यांना पकडून या तरुणाची सिंहगड रोडवरुन सुटका केली.
प्रसाद सूर्यवंशी (वय २८, रा. नारायण पेठ, मुळ रा. बारामती) असे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर रमेश बोराडे Sagar Ramesh Borade (वय ३२, व्यवसाय- हॉटेल व्यावसायिक, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत Kishor Balasaheb Sawant (वय ३२, रा. दसर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे पकडलेल्या दोघांचे नाव आहे. त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद सूर्यवंशी व आरोपी सागर बोराडे याची एका तरुणीबरोबर मैत्री आहे. प्रसाद व तरुणी दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. प्रसाद हा या तरुणीशी बोलत असतो. या कारणावरुन सागर याचे प्रसाद सूर्यवंशी याच्याशी वाद झाला होता. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता सागर बोराडे व किशोर सावंत हे स्कॉर्पिओ घेऊन नारायण पेठेत आले. त्यांनी प्रसादला बाहेर बोलावले. त्याला मारहाण करीत स्कॉर्पिओमध्ये कोंबुन त्याचे अपहरण केले. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष ११२ ला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली. पोलिसांनी तातडीने संपूर्ण शहरातील महत्वाच्या मार्गावर नाकाबंदी केली. सिंहगड रोडच्या दिशेने ते गेल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी तिकडे नाकाबंदी करुन स्कॉर्पिओला अडवून प्रसाद सूर्यवंशी याची सुटका केली. गाडीतील दोघांना पकडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
