Pune Crime News | पुणे : दाऊद इब्राहिमच्या नावाने रेव्हेन्यू इंटेलिजन्स च्या उपसंचालकांना व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
पुणे : Pune Crime News | दुबईहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले काही लॅपटॉप व मोबाईल कस्टम विभागाला सांगून सोडविले नाही, या कारणावरुन रेव्हेन्यू इंटेलिजन्स पुणे युनिटच्या उपसंचालकांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दाऊद इब्राहिम याच्या डी कंपनीचा सदस्य असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत उपसंचालकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुश्ताक शेख व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रेव्हेन्यू इंटेलिजन्स पुणे प्रादेशिक युनिटमध्ये २०२४ पासून उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. ते ३ जून रोजी मुळ गावी जात असताना त्यांना मुश्ताक शेख याने फोन करुन मी तुमचा बातमीदारास ओळखतो, मी तुमच्याकडे बातमीदार म्हणून काम करण्यास इच्छुक आहे, मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले.
त्यास फिर्यादी यांनी नंतर बोलु असे सांगितले. त्यानंतर ५ जून २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे पाटणा येथे जात होते. त्यावेळी शेख याने त्यांना फोन केला व बोलला की, ‘‘मी दुबईहून भारतात येत असताना मुंबइे एअरपोर्टवर माझे काही लॅपटॉप व मोबाईल हे कस्टम विभागाने पकडले आहेत. ते कस्टम अधिकार्यांशी बोलून सोडण्यास सांगा.’’ फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर ६ जून रोजी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी फिर्यादी यांना व्हाटसअपरवर १३ व्हाईस नोट पाठवून धमकी दिली. ‘‘तुम्ही मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटला माहिती दिल्याने माझ्या लोकांवर कारवाई झाली आहे. मी ३० वर्षांपासून तस्करीच्या व्यवसायात आहे. मला कोणी थांबवू शकले नाही. माझे गुन्हेगारांशी चांगले संबंध आहेत. तुमची व तुमची फॅमिली पुणे शहरातून बाहेर कसे पडता ते बघतो, तुम्हाला चांगला धडा शिकवतो, मी तुझी पी एम ऑफिसला तक्रार करणार आहे. माझे ३० वर्षांपासून कस्टमशी संबंध आहेत़ मै तुमको दिखाता हू. तुम्हारे बाप का राज है क्या़’’ असे ते मेसेज होते.
त्यानंतर ६ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या समारास त्यांना एक फोन आला. ‘‘मी गेल्या ३ दशकापासून दाऊद इब्राहिम/ डी कंपनी सिंडिकेटसाठी काम करतो. मी एटीएससाठी एक परिचित चेहरा आहे.’’ त्यांनी फिर्यादी व कुटुंब तसेच त्यांचे डी आर आय पुणे प्रादेशिक युनिटला धमकी दिली आहे. विमानतळ पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
