Pune Crime News | पुणे : हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये JM रोड बॉम्बस्फोटाप्रमाणे टाईमर डिव्हाईस लावल्याचे स्पष्ट
पुणे : हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बमध्ये टाईमर डिव्हाईस लावण्यात आला होता. अशाच प्रकारचे छोटेखानी टाईमर डिव्हाईस जंगली महाराज रोड बॉम्बस्फोटात वापरले होते, जंगली महाराज रोडवर एका पाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्येही छोटेखानी टाईमर डिव्हाईस लावण्यात आले होते. या दोन्हीची प्रक्रिया सारखी असल्याचे दिसून येत आहे. हा बॉम्ब कमी क्षमतेचा असल्याचे दिसून येते.
याबाबत बॉम्ब शोधक व नाशक पथकातील माहितीगार अधिकार्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या बॉम्बमध्ये दोन प्रकारे टायमिंग सेट करता येते. एकामध्ये काऊंट डाऊन पद्धतीने टायमिंग सेट करता येते. दुसर्यामध्ये आपल्याला कधी त्याचा स्फोट घडवून आणायचा, ती वेळ सेट करता येते. या बॉम्बमध्ये तुलनेने मोठे डिजिटल क्लॉक वापरलेले दिसून येत आहे. त्यामध्ये तुम्ही दिवस, वेळ सेट करु शकता.
श्रीमंत दगडुशेट हलवाई मंदिरात दहशतवाद्यांनी बॉम्बची बॅग ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला ते ठेवता आला नाही. त्यातही अशाच प्रकारे टाईम सेट करुन बॉम्ब ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
हा बॉम्ब लो इन्सेंटिव्हचा असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्फोट झाला असता तरी मोठे नुकसान झाले नसते. परंतु, त्यामुळे पुणे शहर व राज्यात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
बॉम्ब ठेवणार्याचा नेमका उद्देश काय होता?. त्याने हा बॉम्ब स्वत: बनविला की त्याला कोणी तो ठेवण्यासाठी दिला, याची उत्तरे त्याला पकडल्यानंतर मिळू शकतील.
कोणताही बॉम्ब सापडल्यानंतर त्याचा सुरक्षित जागी स्फोट घडवून आणून तो अगोदर निकामी केला जातो. त्यानंतरच त्याचे तुकडे हे फॉरेनसिक विभागाला तपासणी साठी पाठविले जातात. जिवंत बॉम्ब पाठविला जात नाही. त्याप्रमाणे या बॉम्बचे निकामी तुकडे फॉरेनसिक विभागाला पाठविण्यात आले आहे. त्यांच्या परिक्षणातून अधिक माहिती पुढे येऊ शकेल, असे या माहितगार अधिकार्यांनी सांगितले.
