Pune PMC News | कचरा प्रकल्पात गैरव्यवहाराचा संशय? उच्च न्यायालयात जाण्याचा प्रशांत जगताप यांचा इशारा
पुणे : Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासंदर्भात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरसेवक प्रशांत जगताप यांनी कचरा प्रकल्पाच्या कामात नियमबाह्य प्रक्रिया आणि संभाव्य गैरव्यवहाराचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत आक्रमकपणे उपस्थित करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मार्च महिन्यात पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता भूमीग्रीन या संस्थेला कचरा प्रकल्प देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत मांडल्यानंतर प्रशासनाने संबंधित प्रस्ताव मागे घेतला होता.
मात्र, आता पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून तोच प्रस्ताव पुढे आणण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) मार्गदर्शक सूचनांनुसार ओला आणि सुका कचरा यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
परंतु, या नियमांचे पालन न करता विशिष्ट संस्थेला लाभ मिळवून देण्याच्या हेतूने प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करत हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा पुणेकरांच्या हितासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
