Pune Crime News | पुणे : चोरीला गेलेल्या पर्शियन हिमालयन मांजराचा कोरेगाव पार्क पोलिसांनी लावला छडा ! कारमधून आलेल्यांनी नेले होते चोरुन, दोघा वकिलासह अ‍ॅनिमल प्लॅनेट पेट शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Pune: Koregaon Park Police track down a stolen Persian Himalayan cat! The cat had been stolen by individuals who arrived in a car; a case has been registered against two lawyers and the owner of 'Animal Planet' pet shop.

पुणे : Pune Crime News | कोरेगाव पार्क येथील एका बंगल्याच्या दारातून रस्त्यावर 25 हजार रुपयांचे पर्शियन हिमालयन जातीचे मांजर आले. त्याचवेळी कारमधून जाणार्‍या महिला व पुरुषाने हे मांजर चोरुन नेले. त्यानंतर त्यांनी ते एका पेट शॉप मालकाला केवळ ७ हजार रुपयांना विकले. या पेट शॉप मालकाने ते मांजर पुढे दोघा युवकांना विकले. कोरेगाव पार्क पोलिसांकडे मांजर चोरीला गेल्याची तक्रार आली होती. तब्बल ३ महिन्यानंतर पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे.

याबाबत उमेश डिगंबर भोसले (वय ५५, रा. मोलेदिना रोड, कॅम्प) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन फराह मेमन, मुबिना मेमन (रा. बोट क्लब रोड), विराज पवार (रा. नाना पेठ) आणि अमरदीप संदिप अहिवळे (रा. एम जी रोड, कॅम्प) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना कोरेगाव पार्कमधील लेन नंबर ३ येथील बंगला नं. ६५ मध्ये ३१ ऑगस्ट २०२६ मध्ये घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश भोसले हे कोरेगाव पार्क येथील राजीव संगतानी यांच्याकडे नोकरीला आहेत. विराज पवार आणि फराह मेमन हे वकील आहेत. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता राजीव संगतानी यांनी फिर्यादी यांना  सांगितले की, त्यांची पर्शियन हिमालयन जातीची मांजर घरात दिसून येत नाही. त्यामुळे भोसले यांनी पुनावाला यांच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची पाहणी केली. तेव्हा रात्री १० वाजण्याच्या सुमारास पर्शियन हिमालयन जातीची मांजर बंगल्याबाहेरील रस्त्यावर आली असताना पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेली महिला व पुरुष हे मांजर घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीवरुन कारचा नंबर मिळविला. ही कार फराह मेमन यांची असून त्यांच्याबरोबरील तरुण विराज पवार असल्याचे समजले. फराह मेमन यांनी मांजरीला त्या दिवशी स्वत:च्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी १ सप्टेंबर रोजी मांजरीला सापडल्या ठिकाणी येऊन आजुबाजुला चौकशी न करता फराह मेमन व तिची आई मुबीना मेमन यांनी ही मांजर परस्पर कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील बाटा चौकातील अ‍ॅनिमल प्लॅनेट या पेट शॉपमध्ये ७ हजार रुपयांना विक्री केली. त्यानंतर पेट शॉप मालक अमरदिप संदिप अहिवळे यांनी हे मांजर ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन मुलांना विकले. परंतु, ही दोन मुले कोण याची काहीही माहिती घेतली नाही.

२५ हजार रुपयांची पर्शियन हिमालयन जातीची मांजर चोरी करुन स्वत:च्या फायद्याकरीता पेट शॉप मालकाला विकल्याबद्दल कोरेगाव पार्क पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार अमित जाधव यांनी चिकाटीने हा तपास केला. परंतु, पेट शॉप मालकाने हे मांजर नेमके कोणाला विकले याची काहीही माहिती न ठेवल्याने त्या मांजरापर्यंत पोहचता आले नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराज डोके यांनी सांगितले की, विराज पवार व फराह मेमन हे वकील आहेत. पेट शॉप मालक याने मांजर खरेदी करताना कोणतीही खात्री केली नाही. तसेच कोणाला विक्री केली, याचीही नोंद न ठेवल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे. पोलीस हवालदार अमित जाधव तपास करीत आहेत.

संपादकीय टीप : सदरील बातमी ही फिर्यादीमध्ये केलेल्या आरोपांवरून आणि पोलिसांनी केलेल्या तपासावरून दिली आहे. बातमीमध्ये दिलेली माहिती हे आमचे स्वतंत्र मत नाही. केवळ फिर्यादीमध्ये केलेल्या आरोपांवरून आणि पोलिसांनी केलेल्या तपासावरून तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ही बातमी प्रसारित करण्यात येत आहे.

You may have missed