Pune Crime News | पुणे : एकमेकांकडे बघण्यावरून कोयत्याने जीवघेणा हल्ला! 17 वर्षीय मुलाच्या डोक्यात वार; दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Pune Crime News | Pune: Life-threatening attack with a machete following a dispute over 'looking at each other'; 17-year-old boy struck on the head; attempted murder case registered against two individuals.

पुणे : Pune Crime News | शिक्षण घेत असलेल्या चौघांमध्ये एकमेकाकडे पाहण्यावरुन वाद झाला़ त्या रागातून एकाने कोयत्याने डोक्यात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेत शुभम गणेश करपेवार (वय १७, रा. शिवांजली निवास, दत्तनगर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ओरा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रेम वावळकर (वय १८, रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव) याच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भारती विद्यापीठ येथील चंद्रभागा चौक येथे बुधवारी १४ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अथर्व प्रदिप खोले (वय १७, रा. शिवांजली निवास, दत्तनगर चौक) हे शिक्षण घेत आहेत. ते बुधवारी रात्री १० वाजता चंद्रभागा चौकातून पायी घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा प्रेम वावळकर व एक अल्पवयीन मुलगा हे समोर आल. फिर्यादी यांना काय बघतोस असे बोलून शिवीगाळ केली. तेव्हा अथर्व खोले याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी ‘‘तुला लय मस्ती आलीय, तुला आज मारुनच टाकतो,’’ असे बोलून त्यांनी हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस वार केला.  दुसरा वार डोक्याच्या समोरील बाजूस केला. खोले याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तिसरा वार अथर्व याच्या हातावर करुन जखमी केले. गंभीर अवस्थेत फिर्यादी यांना ओरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव तपास करीत आहेत.

You may have missed