Pune Pimpri Crime News | पोलीस भरतीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवुन तरुणाची पावणेचार लाखांची फसवणूक; तिघा महाभागांवर गुन्हा दाखल
पुणे / पिंपरी : Pune Pimpri Crime News | पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करीत असलेल्या तरुणाला पोलीस भरतीमध्ये नोकरी लावुन देतो, असे आमिष दाखवून त्याच्याकडून ४ लाख रुपये घेऊन २५ हजार रुपये परत करुन पावणे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत मोशी येथील एका २४ वर्षाच्या तरुणाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुरज रामदास शिवले Suraj Ramdas Shivle (वय ३५, रा. वखारीचा मळा, वढु बुद्रुक, ता. शिरुर), बिपीन दीपक मोहिते Bipin Deepak Mohite (वय ४०, रा. नाशिक), संतोष चंद्रकांत कटारे Santosh Chandrakant Katare (वय ३८, रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुणे, मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथे जुलै २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाने जुलै २०२४ मध्ये रायगड पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला होता. त्या अनुषंगाने त्यांनी वाघोली येथील जिद्द अॅकॅडमीमध्ये पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू केली होती. यादरम्यान त्यांची ओळख सुरज शिवले याच्याशी झाली. त्याने या तरुणाचा विश्वास संपादन करुन त्यांना पोलीस भरतीत नोकरी लावून देतो, असे सांगून बिपीन मोहिते व संतोष कटारे यांची ओळख करुन दिली. सुरज शिवले याने त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले. त्यातील २५ हजार रुपये नंतर परत केले. त्यांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे वेगवेगळ्या कारणासाठी बोलावून घेतले. पोलीस भरतीसाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून बिपीन मोहिते याने त्यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. भरतीविषयी विचारल्यावर त्यांना सुरुवातीला वेगवेगळी उत्तरे ते देत असत. भरती प्रक्रिया पूर्ण झाली तरी त्यांना भरती करुन न घेतल्याने त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा त्यांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. शेवटी त्यांनी आता एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक राज पानसरे तपास करीत आहेत.
