Pune Crime News | पुणे : ‘रीलस्टार’ संतोष पंडितची येरवडा जेलमध्ये रवानगी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला मोबाइल, सिमकार्ड आणि ट्रायपॉड जप्त
पुणे: Pune Crime News | उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत समाजमाध्यमावरील रीलमध्ये कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संतोष पंडित याला पुणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वादग्रस्त रील तयार करण्यासाठी कथितरीत्या वापरण्यात आलेला आयफोन, त्यातील सिमकार्ड आणि ट्रायपॉड स्टँड कोथरूड पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पंडितला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान महिला साक्षीदारांकडेही चौकशी सुरू आहे. आरोपी त्यांच्यावर दबाव आणण्याचा किंवा समाजमाध्यमांद्वारे त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी शक्यता सरकारी पक्षाने न्यायालयासमोर व्यक्त केली.
या गुन्ह्यात आणखी पुरावे संकलित करून आरोपपत्र न्यायालयात दाखल करायचे असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.
सरकारी वकील योगेश कदम यांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
