Pune Crime News | पुणे : सासवड पोलिसांकडून कात्रजमध्ये राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तुलासह अटक; ‘मकोका’ अंतर्गत झाली होती कारवाई
सासवड (पुणे) : Pune Crime News | सासवड पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करून मोठी कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि मोटारसायकल असा एकूण ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोहित राजू माने Rohit Raju Mane (वय २४, रा. गुजरवाडी, दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक बुधवारी (दि. ७) हद्दीत गस्त घालत होते. यावेळी सासवड येथील सैनिक कॅन्टीनच्या पाठीमागे एक संशयित तरुण मोटारसायकलवर (एमएच १२-टीएल ८७९६) बसला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताची चौकशी केली. सुरुवातीला आरोपीने आपले नाव सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता त्याने आपल्याकडे पिस्तूल असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित माने हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल असून, कोंढवा, खडक आणि वाघोली पोलीस ठाण्यांमध्येही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अधिकारी शुभम कुमार आणि भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, परमेश्वर गोडसे, पोलीस हवालदार दत्तात्रेय काळे, विशाल जाधव, पोलीस नाईक गोकुळ हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे आणि प्रवीण शेंडे यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत.
