Pune Crime News | डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीपासून साडेबारा लाख रुपये वाचविण्यात येरवडा सायबर पथकाला यश
पुणे : Pune Crime News | डिजिटल अरेस्टचा प्रकार वेळीच पोलिसांकडे तक्रार दिल्याने येरवडा सायबर पथकाला एका कुटुंबाचे साडेबारा लाख रुपये वाचविण्यात यश आले आहे.
प्रमोद माधव गोरे यांच्या पत्नीला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तुम्ही नरेश गोयल याला आपले बँक खाते वापरण्यास दिले आहे. तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत, अशी भिती दाखवुन त्यांच्याकडील बँक खात्याची, मुदत ठेवीची माहिती घेतली. पासवर्ड घेण्यात आले. जवळपास एक दिवसाहून अधिक काळ त्यांना कोणाशी संपर्क साधू दिला नाही. त्यांना सर्व पैसे एका खात्यात घेण्यास सांगितले. त्यासाठी ७२ तासांचा वेळ दिला. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना त्यांनी सर्व माहिती सांगितले. तोपर्यंत बँकेची वेळ संपत चालली होती. असे असताना पोलिसांनी बँक अधिकार्यांना हा प्रकार कळविला. त्यानंतर बँक अधिकार्यांनी तातडीने त्यांचे बँक खाते ब्लॉक केल्याने बँक खात्यातील १२ लाख ५० हजार रुपये सुरक्षित करण्यात यश आले आहे.
ही कामगिरी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक शारदा कोकाटे, केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस अंमलदार समीर पिलाने, मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे, रोहिणी भोकसे, मिनाक्षी कापडे यांनी केली आहे.
