Pune Crime News | पुणे: ज्येष्ठ महिलेची सोन्याच्या साखळीची चोरी; सराईत टोळीतील तिघांना अटक, 15 लाखांचे दागिने जप्त

Pune Crime News | Pune: Theft of an elderly woman's gold chain; three skilled gang members arrested, jewelry worth 15 lakh seized

पुणे: Pune Crime News | रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सराईत टोळीतील तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून विविध चोरीच्या गुन्ह्यांतील सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, 14 जून 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक ज्येष्ठ महिला पॉवर हाऊस चौक ते भवानी पेठ असा रिक्षातून प्रवास करत होती. यावेळी रिक्षातील चार अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून तिच्या गळ्यातील सुमारे 25 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा तपास करताना समर्थ पोलिसांच्या पथकाला आरोपी जळगाव परिसरातील असून, वृद्ध प्रवाशांना प्रवासादरम्यान लक्ष्य करून हातचलाखीने मौल्यवान वस्तू चोरण्याची त्यांची पद्धत असल्याची माहिती मिळाली.

तपासात शाकीर जाकीर तेली Shakeer Zakir Teli, (वय 29, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) याचे नाव समोर आले. त्याला 1 जुलै 2026 रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर त्याचे साथीदार मोसीन खान नूर खान Mosen Khan Noor Khan, (वय 31, रा. जळगाव) आणि इस्माईल उर्फ राजू शब्बीर शेख Ismail aka Raju Shabbir Sheikh, (वय 50, रा. जळगाव) यांचा शोध घेण्यात आला.

हे दोघे अशाच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना मालधक्का चौक, पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात आले. त्यांना 2 सप्टेंबर 2026 रोजी संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक आरोपींनी सिंहगड रोड, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

त्यांच्याकडून चोरीच्या मालाचा तपास करताना पोलिसांनी सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून, त्यांची अंदाजे किंमत 15 लाख रुपये आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि तपास पथकाने केली.

You may have missed